ग्रीन यादीत नाव कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:57 IST2017-11-03T00:57:34+5:302017-11-03T00:57:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील किती शेतक-यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला, ...

ग्रीन यादीत नाव कधी ?
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील किती शेतक-यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला, याची एकत्रित आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जदार शेतकºयांची माहिती प्रशासनाकडे नसल्याने या बँकांचे कर्जदार शेतकरी रोज बँकेत चकरा मारत आहेत, तर बँकांकडे पात्र शेतकºयांची कुठलीच माहिती नसल्याने कर्जमाफीच्या ग्रीन यादीत नाव येणार तरी कधी, असा प्रश्न शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या कर्जदार शेतक-यांची माहिती मुख्य कार्यालयामार्फत आपले सरकार पोर्टलवर आॅनलाईन भरली आहे. शेतक-यांनी कर्जमाफीसाठी भरलेला अर्ज व बँकांनी भरलेली माहिती याचे संगणकीकृत वर्गीकरण करून पात्र शेतकºयांची ग्रीन यादी तयार होणार आहे. सदर यादी आॅनलाईन अपडेट झाल्यानंतर पात्र शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, कर्जमाफीची यादी तयार करताना रोज नवीन बदल केले जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत मोजक्याच शेतक-यांची नावे ग्रीन यादीत आली आहेत.
जालना तालुक्यातील गोंदेगाव व वंजारउम्रद येथील एका तर मजरेवाडी येथील दहा शेतक-यांची नावे पात्र यादीत दिसत आहेत. अशाच प्रकारे बहुतांश गावांमध्ये तीन, चार दहा शेतक-यांची नावे पात्र यादीत दिसत आहेत. काही गावांमधील एकही शेतक-याचे नाव ग्रीन यादीत नाही. नेमकी कुठली कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे पात्र यादीत नाव आले नाही, याबाबत विचारणा करण्याची सोय कुठेच नसल्याने चिंता वाढली आहे. आता राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जदार असलेल्या पात्र शेतकºयांची नावे थेट बँकेत येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी सांगितले. एकूणच कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कशी राबवणार, पात्र शेतक-याचे नाव यादीत कधी येणार याबाबत कुठलीही निश्चित माहिती नाही.