व्हीलचेअर असूनही उपयोग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST2021-02-05T04:18:03+5:302021-02-05T04:18:03+5:30

औरंगाबाद : सोबत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला व्हीलचेअरची गरज आहे. त्यामुळे येथे व्हीलचेअर कुठे मिळेल, असा प्रश्न मुख्य बसस्थानक ...

Wheelchairs are of no use | व्हीलचेअर असूनही उपयोग नाही

व्हीलचेअर असूनही उपयोग नाही

औरंगाबाद : सोबत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला व्हीलचेअरची गरज आहे. त्यामुळे येथे व्हीलचेअर कुठे मिळेल, असा प्रश्न मुख्य बसस्थानक येथील जवळपास ६ ते ७ कर्मचाऱ्यांना विचारण्यात आला. परंतु, प्रत्येक कर्मचाऱ्याने येथे व्हीलचेअर उपलब्धच नाही, असे सांगितले. बसस्थानकात व्हीलचेअर आहे की नाही, हेच कर्मचाऱ्यांना माहिती नसल्याने व्हीलचेअर असूनही तिचा काही उपयोग नाही, अशी परिस्थिती येथील मुख्य बसस्थानकात पाहायला मिळाली. स्मार्ट सिटी होऊ पाहणाऱ्या औरंगाबादच्या प्रशासनाने शहरातील बसस्थानकेही आता स्मार्ट बनविणे नितांत गरजेचे झाले आहे. मुख्य बसस्थानकात व्हीलचेअर असूनही ती कोणाला दिसत नाही आणि व्हीलचेअर असूनही ती चालविण्यासाठी रॅम्प तयार केलेले नाहीत. त्यामुळे मग अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांनी अडखळतच प्रवास करायचा का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

बसस्थानके, सरकारी कार्यालये, रेल्वे स्थानके, पर्यटन स्थळे, सार्वजनिक जागा या सर्वच ठिकाणी ज्येष्ठ आणि अपंगांच्या दृष्टीने योग्य त्या सोयीसुविधा असणे गरजेचे आहे. मात्र, या सर्वच सुविधांची वानवा बसस्थानकासह शहरातील अन्य सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळते.

चौकट :

व्हीलचेअर अधिकाऱ्यांच्या खोलीत

मुख्य बसस्थानक आणि सिडको बसस्थानक या दोन्ही ठिकाणी व्हीलचेअर आहेत. मात्र, या बसस्थानकांवर व्हीलचेअर आहेत की नाही, असतील तर कोठे आहेत, याची काहीही माहिती सामान्य लोकांना नाही. मुख्य बसस्थानकात अधिकाऱ्यांसाठी असणाऱ्या कक्ष क्रमांक ५ येथे व्हीलचेअर ठेवण्यात आली आहे. सहसा या ठिकाणी कुणी जातही नाही आणि इथे व्हीलचेअर असू शकते, याचा अंदाजही कुणाला येत नाही.

चौकट :

बसस्थानकात रॅम्पच नाही

मुख्य बसस्थानकात व्हीलचेअर उपलब्ध असली तरी ती चालविण्यासाठी आवश्यक असणारा रॅम्पच नसल्याने व्हीलचेअरचा वापर करणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होतो. बसस्थानकाच्या कोणत्याही प्रवेशद्वाराजवळ रॅम्प नाहीत. याशिवाय बसस्थानकाच्या पायऱ्यादेखील एवढ्या खराब अवस्थेत आहेत की, तेथूनही विनाअडथळा मार्गक्रमण करणे व्हीलचेअरला शक्य होणारे नाही.

प्रतिक्रिया :

१. मागील दीड वर्षापासून बसस्थानकामध्ये व्हीलचेअर आहे. पण ती कक्ष क्रमांक ५ येथे ठेवलेली आहे. या चेअरचा वापर खूप कमी जणांकडून केला जातो. बसस्थानकावर आलेल्या ज्येष्ठांना आणि दिव्यांगांना याची माहिती व्हावी, यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. येथे व्हीलचेअर उपलब्ध आहे, अशी माहिती सांगणारे फलक मुख्य प्रवेशद्वार आणि इतरत्रही काही ठिकाणी लावू.

- एस. ए. शिंदे

एस. टी. अधिकारी

२. पुण्याला जायचे असल्याने मी भोकरदन येथून औरंगाबादला आलो आहे. चालण्याचा त्रास होतो. त्यामुळे काठीचा आधार घेत चालावे लागत आहे. या बसस्थानकावर व्हीलचेअर उपलब्ध नाही, असे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे मग काठीचा आधार घेऊनच बसपर्यंत पोहोचावे लागले. व्हीलचेअर असती तर चालण्याचे कष्ट नक्कीच वाचले असते.

- उत्तम जाधव, प्रवासी

चौकट :

बसस्थानकातून ये-जा करणाऱ्या गाड्या - २५०पेक्षा अधिक

बसस्थानकातून प्रवास करणारे प्रवासी - ३ ते ४ हजार

Web Title: Wheelchairs are of no use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.