काय असेल या वेळेस ‘मध्य’म मार्ग?
By Admin | Updated: June 13, 2014 01:11 IST2014-06-13T00:59:16+5:302014-06-13T01:11:17+5:30
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद लोकसभेतील दणदणीत यशाने महायुतीतील अनेकांच्या आशा पल्लवित झाल्याने युतीच्या उमेदवारांची यादी दिवसागणिक वाढत आहे,

काय असेल या वेळेस ‘मध्य’म मार्ग?
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद
लोकसभेतील दणदणीत यशाने महायुतीतील अनेकांच्या आशा पल्लवित झाल्याने युतीच्या उमेदवारांची यादी दिवसागणिक वाढत आहे, तर निवडणुकीत एका पराभवाने खचणे हा काँग्रेस आघाडीचा स्वभावधर्म नाही. त्यामुळे आघाडीकडूनही मातब्बर मंडळी औरंगाबाद मध्यमधून लढण्यासाठी शड्डू ठोकत आहे. अर्थात, या वेळेस मनसे, आम आदमीसह रिपाइं आदी अनेक पर्याय मतदारांसमोर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. युती व आघाडीला पर्याय म्हणून समोर आलेले तत्कालीन अपक्ष उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा मध्यम पर्याय मतदारांनी स्वीकारला होता. यावेळेस संदर्भ व परिस्थितीही बदलली आहे.
२००८ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत औरंगाबाद शहरात विधानसभेचे पूर्व, पश्चिम व मध्य, असे तीन मतदारसंघ तयार झाले. त्यात मध्य मतदारसंघ नव्याने तयार करण्यात आला. औरंगाबाद मध्य मतदारसंघ हा शहराचा मुख्य भाग आहे. गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेत युतीची सत्ता आहे. या सत्तेने शहरवासीयांना काय दिले? याचा लेखाजोखा प्रत्येक निवडणुकीत उपस्थित केला जातो; परंतु निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात धार्मिक भावनेवर मतदारांचे ध्रुवीकरण होत असल्याचा अनुभव येथे कायम येतो. शिवसेनेशी बंडखोरी करून अपक्ष निवडून आलेले प्रदीप जैस्वाल अडीच वर्षांपूर्वी पुन्हा स्वगृही परतले व या मतदारसंघातील गणिते पुन्हा बदलली.
दरम्यान, लोकसभेतील विजयामुळे युतीकडे उमेदवारांचा लोंढा वाढला आहे. विद्यमान आ. प्रदीप जैस्वाल यांचा या मतदारसंघावर पहिला दावा राहणार असला तरी माजी आमदार किशनचंद तनवाणी, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे यांचीही नावे चर्चेत आहेत. जैस्वाल यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केल्यामुळे त्यांच्या बाजूने झुकलेले दलित, मुस्लिम मतदार या वेळेस काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असली तरी या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार १,९१६ मतांनी मागे राहिला. दिलासा एवढाच की २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार ४ हजार ९६६ मतांनी मागे होता, या वेळेस त्यात किंचित सुधारणा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वेळेस या मतदारसंघातून कदीर मौलाना यांना उमेदवारी दिली. लोकसभेत काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य देणाऱ्या या मतदारसंघाने कदीर मौलाना यांचा ८,३८४ मतांनी पराभव केला होता. त्याचे कारण प्रदीप जैस्वाल यांना सर्वधर्मीयांनी केलेले मतदान हे होते. या वेळेस हे गणित बदललेले दिसत आहे. शिवाय राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? यावर बरेच अवलंबून आहे. राष्ट्रवादीकडून शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, कदीर मौलाना व अफसरखान यांनी तिकिटासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
याशिवाय मनसेकडून तिकीट मिळावे यासाठी नगरसेवक राज वानखेडे, गणेश वानखेडे, दिलीप चितलांगे, सतनामसिंग गुलाटी आदींची फिल्डिंग लावणे सुरू आहे. आम आदमी पार्टीही आपला उमेदवार रिंगणात उतरविणार आहे. नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनीही तयारी सुरू केली आहे.
पूर्वाश्रमीच्या औरंगाबाद पश्चिमवर १९८५ पर्यंत काँग्रेसचे आधिपत्य राहिले आहे. या मतदारसंघाने १९९० मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना कौल दिला. त्यानंतर १९९९ व २००४ मध्ये काँग्रेसचे राजेंद्र दर्डा यांनी शिवसेनेचे अनुक्रमे गजानन बारवाल व प्रदीप जैस्वाल यांना पराभूत केले होते. त्यानंतर २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होऊन तयार झालेला मतदारसंघ काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात गेला; परंतु राष्ट्रवादीला हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत आपल्याकडे राखता आला नाही.
महापालिकेचे ३४ वॉर्ड या मतदारसंघात येतात. दलित व मुस्लिमबहुल असलेल्या मतदारसंघातून अपक्ष १०, शिवसेना १३, भाजपा ४, काँग्रेस २, राष्ट्रवादी ४ व मनसेचा एक नगरसेवक आहे. अपक्ष नगरसेवकांमध्ये मुस्लिम व दलित नगरसेवकांची संख्या अधिक आहे. युतीच्या नगरसेवकांची संख्या १७ आहे; परंतु युतीचे विकास जैन यांना गेल्या वेळेस मोठा मानहानिकारक पराभव पत्करावा लागला आहे. त्याचे कारण विद्यमान आ. प्रदीप जैस्वाल यांना मुस्लिमांसह दलित मतदारांची मिळालेली मोठी सहानुभूती हे होय.
२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते