मंत्र्यांच्या स्वागताची ही कोणती पद्धत ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:59+5:302021-02-05T04:16:59+5:30
औरंगाबाद: कोरोनासारखी महामारी चालू असताना कोरोना संपला असे समजून रस्ता रोखून भर रस्त्यात मंत्र्यांचे स्वागत करण्याची नवीनच पद्धत सुरू ...

मंत्र्यांच्या स्वागताची ही कोणती पद्धत ?
औरंगाबाद: कोरोनासारखी महामारी चालू असताना कोरोना संपला असे समजून रस्ता रोखून भर रस्त्यात मंत्र्यांचे स्वागत करण्याची नवीनच पद्धत सुरू झाली की काय, असा सवाल मंगळवारी सायंकाळी चिकलठाणा येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सत्काराकडे बघून औरंगाबादकर विचारत आहेत.
संयोजकांना हा सत्कार कशासाठी करायचा होता, धनंजय मुंडे यांचा नवीन पराक्रम काय, मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात आले नव्हते. कित्येकदा ते विमानाने औरंगाबादला विमानाने उतरून बीड-परळीकडे रवाना झालेले आहेत. मग हा सत्कार कशासाठी व तो एवढ्या उत्साहात कशासाठी हे प्रश्न गुलदस्त्यातच आहेत.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी सांगितले, मलाही त्यातले काही माहिती नव्हते. मी सहज गेलो होतो. आता यापुढे पक्षाला विचारात न घेता परस्पर सत्कार घेणाऱ्यांना समज द्यावी लागेल. कोरोना जणू संपला असे समजून धनंजय मुंडे यांचा सत्कार वाहतुकीला अडथळा निर्माण करून करण्यात आला. ही तर सत्तेची नशाच म्हटले पाहिजे. संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी केली.
विमानतळावरून उतरून शहरात येणाऱ्या मंत्र्यांचे वा मोठ्या नेत्यांचे सत्कार विमानतळावरच झालेले किंवा मुकुंदवाडी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झालेले आहेत.त्यामुळे काल झाला तसा वाहतुकीचा अडथळा कधी झाला नाही.काल पोलिसांनीही बघ्याची भूमिका का घेतली याबद्दल नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.