‘मुन्नाभार्इं’च्या गॉडफादरचे काय?

By Admin | Updated: April 16, 2016 01:49 IST2016-04-16T01:10:22+5:302016-04-16T01:49:19+5:30

रत बटालियनच्या जवान भरती परीक्षेत ‘हायटेक’ कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मदन गुसिंगे आणि विजयसिंह जारवाल याच्यासह भावाच्या नावावर परीक्षा देणाऱ्या पवन जरावंडे

What is the Godfather of Munnabhai? | ‘मुन्नाभार्इं’च्या गॉडफादरचे काय?

‘मुन्नाभार्इं’च्या गॉडफादरचे काय?


रत बटालियनच्या जवान भरती परीक्षेत ‘हायटेक’ कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मदन गुसिंगे आणि विजयसिंह जारवाल याच्यासह भावाच्या नावावर परीक्षा देणाऱ्या पवन जरावंडे या तिघा ‘मुन्नाभार्इं’ना सोमवारी अटक करण्यात आली. जवान पदाच्या परीक्षेत पहिल्यांदाच ‘मुन्नाभाई’ पकडले गेले, अशातला भाग नाही. पोलीस, लिपिक, शिपाई, वनरक्षकासारख्या तृतीय व चतुर्थ श्रेणींच्या पदांच्या भरतीत आता ही नित्याचीच बाब झाली आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये कशा प्रकारे ‘फिक्सिंग’ चालते, हे ‘लोकमत’ने २०१३ यावर्षी उघडकीस आणले होते.
विविध पदांच्या भरतीसाठी सरकारी खात्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून देणारे रॅकेटच राज्यात सक्रिय आहे. या रॅकेटचा केंद्रबिंदू हे औरंगाबाद शहर आहे. राज्यातील कुठल्याही भागात ‘मुन्नाभाई’ पकडले गेल्यास ते निश्चितच औरंगाबाद व जालना जिल्ह्याचेच रहिवासी समजावेत, एवढी त्यांची पाळेमुळे औरंगाबादेत घट्ट रुजली आहेत. दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्याच्या तलाठी भरतीचा पेपर औरंगाबाद जिल्ह्यातील टोळीनेच फोडला होता. राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कर सहायक परीक्षेचा पेपरही औरंगाबादेतच ‘लिक’ झाला होता, हे विशेष.
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी लाखोंची सुपारी घेणाऱ्या ‘डमी’ उमेदवारांची एक खासियत होती. ‘एमकेसीएल’सारख्या परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीचा त्यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास केला आहे. या संस्था कशा पद्धतीने परीक्षांच्या प्रवेशपत्रांचे वाटप करतात, यावर ‘पीएच.डी.’ मिळविण्याएवढा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. उमेदवाराच्या नावाशी मिळत्याजुळत्या नावाने परीक्षेचा अर्ज भरायचा, जन्मदिनांक व जातीचा संवर्गही सारखाच टाकायचा. जेणेकरून कोणत्याही पद्धतीचा वापर करून प्रवेशपत्राचे वाटप केल्यास आपला क्रमांक उत्तीर्ण होण्याची सुपारी देणाऱ्या जवळच येईल, याची दक्षता ते घेत असतात. त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षा केंद्रात पेपरची अदलाबदल करून काम फत्ते करून देण्याची जबाबदारी ते पार पाडीत असतात.
स्पर्धा परीक्षांमध्ये पारंगत असणारे हुशार विद्यार्थीच ‘डमी’ उमेदवार बनत असल्याचेही आढळून आले आहे. परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी करण्यापेक्षा इतरांना उत्तीर्ण करून त्या बदल्यात लाखो रुपयांची कमाई करण्यालाच त्यांनी आपले ‘करिअर’ बनविले आहे. ‘डमी’ उमेदवारांची चलाखी ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर प्रवेशपत्र वाटपाची पद्धत बदलण्यात आली. प्रवेशपत्राबरोबर आधार कार्डसारखा ओळखीचा पुरावा बाळगणे सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, ‘डमी’ उमेदवारांना आळा बसला होता; परंतु या ‘मुन्नाभार्इं’नी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे.
बनियनमध्ये विशिष्ट प्रकारची शिलाई करून त्यात स्मार्टफोन लपून ठेवायचा. परीक्षा केंद्रात जाताच केंद्र प्रमुखाची नजर चुकवून प्रश्नपत्रिका स्कॅन करायची आणि बाहेरील ‘गॉडफादर’कडे पाठवायची. तो सांगेल त्याप्रमाणे उत्तरे द्यायची, असे प्रकार सुरू झाले आहेत. उत्तरे ऐकण्यासाठी वापरला जाणारा हेडफोन शस्त्रक्रिया करून कानात बसवून घेतला जात असल्याची चर्चाही आता सुरू आहे. अशा परिस्थितीत परीक्षेत गैरप्रकाराचा अवलंब करणाऱ्या ‘मुन्नाभाई’प्रमाणेच त्यांच्या ‘गॉडफादर’चा शोध घेणे गरजेचे आहे. या ‘गॉडफादर’ मंडळींच्या मुसक्या आवळल्याशिवाय गैरप्रकार थांबणार नाहीत. त्यांनी आतापर्यंत शासकीय सेवेत भरती केलेल्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणेदेखील गरजेचे आहे.-

Web Title: What is the Godfather of Munnabhai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.