बँकांमधील गर्दीचे करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:02 IST2021-05-04T04:02:01+5:302021-05-04T04:02:01+5:30
औरंगाबाद : ‘साहेब, अमूक अमूक योजनेेचे पैसे खात्यात कधी जमा होणार, साहेब, एवढे पासबुक प्रिंट करून द्या....’ अशी सध्या ...

बँकांमधील गर्दीचे करायचे काय?
औरंगाबाद : ‘साहेब, अमूक अमूक योजनेेचे पैसे खात्यात कधी जमा होणार, साहेब, एवढे पासबुक प्रिंट करून द्या....’ अशी सध्या टाळता येण्याजोगी किंवा फोनवर चौकशी करता येण्यासारखी कारणे घेऊन अनेक लोक विनाकारण बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. कोरोनाचा कहर वाढत असताना प्रत्येक दिवशी तेवढ्याच ताकदीने उसळणाऱ्या या बँकांमधील गर्दीचे करायचे काय, असा प्रश्न आता बँक कर्मचाऱ्यांनाही त्रस्त करत आहे. पैसे काढणे, पैसे पाठविणे ही प्रत्येकाची गरज आहे. त्यामुळे या गोष्टींसाठी ग्राहकांनी बँकेत येणे साहजिक आहे; पण अनेकदा पासबुक प्रिंट करणे, योजनांची चौकशी करणे, अमूक फॉर्म आला का, म्हणून विचारणे अशा सध्या काहीही आवश्यकता नसलेल्या गोष्टींसाठी लोक तासन्तास रांगेत उभे राहत आहेत. या सर्व गोष्टींसाठी ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहेत. बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना हे पर्याय वारंवार समजावून सांगितलेही जातात; पण तरीही लोक बँकेत येण्याबाबत आग्रही आहेत.
बँकेत येणाऱ्या लोकांपैकी बहुतांश लोक हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना होण्याचा धोका अधिक असून, विनाकारण होणारी ही गर्दी बँक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाच्या कवेत ढकलणारी आहे. यामुळे या ज्येष्ठ नागरिकांच्या घरच्या तरुण लोकांनी पुढाकार घ्यावा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ज्येष्ठांना घरबसल्या पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असा तोडगा यावर निघू शकतो.
चौकट :
अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया
१. बँकेत येणाऱ्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांचे काम महत्त्वाचे नसतेच. पासबुक प्रिंटिंग, पैसे काढणे, पैसे टाकणे अशा कामांसाठी अनेक लोक बँकेत येतात. ऑनलाइन स्टेटमेंट, बॅलेन्स इन्क्वायरी असे पासबुक प्रिंटिंगसाठीचे अनेक पर्याय घरबसल्या उपलब्ध आहेत; पण तरीही पासबुक भरून घेण्याबाबत लोक आग्रही आहेत. यातील बहुतांश लोक ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. कितीदा समजून घातले तरी विनाकारण वाद घालतात. ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्याशी फार हुज्जत घालता येत नाही. बँकेबाहेर ॲन्टिजन करणे अनिवार्य केले तर या विनाकारण येणाऱ्या गर्दीला नक्कीच आळा बसेल.
- अमित खडके, बँक अधिकारी.
२. रोजच बँकेत होणारी गर्दी पाहता आज बँका म्हणजे कोरोना पसरविणारे महत्त्वाचे ठिकाण झाले आहे. पैसे काढणे, पैसे भरणे आणि आरटीजीएस एनईएफटी या कामांसाठीच लोकांनी बँकेत यावे, अशा सूचना आहेत. तरीही सध्या आवश्यक नसणाऱ्या कामांसाठी लोक गर्दी करतात. शासनाने जाहीर केलेल्या योजनांनुसार अनेकांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्याच्या चौकशीसाठीही लोक वारंवार बँकेत येतात. औषधाची चिठ्ठी घेऊन फिरावे, तसे आता बँकेचे पासबुक घेऊन विनाकारण लोक फिरत आहेत आणि बँकांमधील गर्दी वाढवत आहेत.
- हेमंत जामखेडकर, बँक अधिकारी.
चौकट :
ग्राहकांच्या प्रतिक्रीया-
१. बँकेच्या दारापाशी जी भली मोठी रांग होती, त्यापैकी ७० टक्के ज्येष्ठ नागरिक होते. महिन्याची सुरुवात असल्यामुळे हे सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांचे निवृत्ती वेतन काढण्यासाठी आलेले होते.
२. खात्यात किती पैसे शिल्लक आहेत, हे पासबुक प्रिंट केल्याशिवाय कसे कळणार. आम्हाला ऑनलाइन पद्धतीने आमचे खाते तपासता येत नाही. त्यामुळे पासबुक प्रिंट करायला आलो आहोत, असे रांगेतील बऱ्याच ग्राहकांनी सांगितले.
३. खात्यातले पैसे काढायला आलेलो आहोत, असेही काही जणांनी सांगितले. तर ज्या बँकांमध्ये आधार केंद्र आहेत, तेथे नाव बदलण्यासाठी किंवा अन्य दुरुस्ती करण्यासाठी आलो आहोत, असे काही ग्राहक म्हणाले.
फोटो ओळ :
१. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅनॉट प्लेस येथील शाखेत झालेली गर्दी.
२. बँक ऑफ इंडियाच्या अमरप्रित चौकातील शाखेसमोर असलेली ग्राहकांची रांग.