तालुक्यातील आठ अंगणवाड्या आयएसओ होण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: July 1, 2014 00:12 IST2014-06-30T23:49:11+5:302014-07-01T00:12:06+5:30
पालम : तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आठ अंगणवाड्या आयएसओ होण्याच्या मार्गावर आहेत़

तालुक्यातील आठ अंगणवाड्या आयएसओ होण्याच्या मार्गावर
पालम : तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आठ अंगणवाड्या आयएसओ होण्याच्या मार्गावर आहेत़ औरंगाबाद येथील पथकाकडून मागील दोन दिवसांपासून या अंगणवाड्यांची तपासणी करण्यात येत आहे़
पालम तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत १५० अंगणवाड्या आहेत़ या अंगणवाडी केंद्रात पूर्व प्राथमिक शिक्षण व पोषण आहार दिला जातो़ या अंगणवाड्यांपैकी काही अंगणवाड्या चांगले काम करीत आहेत़ यापैकी आठ अंगणवाड्यांना चांगला दर्जा राखल्याबद्दल आयएसओ नामांकन मिळण्याची शक्यता आहे़ पेठशिवणी येथील अंगणवाडी क्रमांक ४, वाडी खुर्द, पालम अंगणवाडी क्रमांक ५ व ९, केरवाडी अंगणवाडी क्रमांक २, चाटोरी अंगणवाडी क्रमांक ३, भालकुडकी व लांडकवाडी या अंगणवाड्यांचा समावेश आहे़
आयएसओ नामांकनासाठी औरंगाबाद येथील एजन्सी परिजात कन्सल्टन्सीकडून अंगणवाडी केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे़ या पथकात परीक्षक म्हणून प्रशांत जोशी हे आहेत़ या अंगणवाडी केंद्रातील मुलभूत सुविधा, पूर्व प्राथमिक शिक्षण, वैद्यकीय सेवा, शंभर टक्के गणवेश, पिण्याचे पाणी स्वच्छ, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, शैक्षणिक साहित्याचा वापर, खेळासाठीचे साहित्य, अंगणवाडीचा स्वच्छ परिसर, मुलांची वैयक्तीक स्वच्छता या विषयी पाहणी व तपासणी केली जात आहे़ यामुळे आठ अंगणवाडी केंद्रांना आयएसओ नामांकन मिळण्याची शक्यता आहे़
यासाठी प्रकल्प अधिकारी शांता पांचाळ, विस्तार अधिकारी सय्यद सादेक, स्वप्नील कुलकर्णी, पर्यवेक्षिका पूष्पा बोथीकर, रेणुका येरगे, गायकवाड यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस परिश्रम घेत आहेत़ (प्रतिनिधी)