‘मांजरा’तून कोणत्याही क्षणी होणार पाणी बंद..!

By Admin | Updated: June 24, 2014 00:42 IST2014-06-24T00:42:02+5:302014-06-24T00:42:02+5:30

आशपाक पठाण , लातूर गेल्या वर्षभरापासून पाणीटंचाईचे चटक्यावर चटके सहन करणाऱ्या लातूरकरांचे आता पाण्यासाठी अतोनात हाल होणार आहेत़

Water will be stopped at any time from 'Manjra'! | ‘मांजरा’तून कोणत्याही क्षणी होणार पाणी बंद..!

‘मांजरा’तून कोणत्याही क्षणी होणार पाणी बंद..!

आशपाक पठाण , लातूर
गेल्या वर्षभरापासून पाणीटंचाईचे चटक्यावर चटके सहन करणाऱ्या लातूरकरांचे आता पाण्यासाठी अतोनात हाल होणार आहेत़ मांजरा धरणातील पाण्याने तळ गाठल्याने ही अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पातील पंपाना पुरेसे पाणी मिळविण्यासाठी खोदलेले चरही कोरडेठाक पडत आहेत. नागझरीत गाळ धरुन ०. १ दलघमी पाणी आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसात वरूण राजा मनासारखा बरसला नाही तर साडेपाच लाख लोकसंख्येच्या शहराला जलसंकटातून बाहेर पडणे अवघड आहे.
लातूरकर आणि पाणीटंचाई हे समीकरण गेल्या वर्षभरापासून अधिकच घट्ट जुळले आहे़ मागील वर्षीही भर पावसाळ्यातही शहरवासियांना आठवड्यातून एकदा पाणी मिळाले़ त्यानंतर लागलीच दहा दिवसांतून एकवेळा पाणीपुरवठा सुरू झाला तो अजूनही कायम आहे़ महानगरपालिका कार्यक्षेत्रात वाढती लोकसंख्या, पाण्याचा बेसुमार वापर यामुळेही टंचाईत भर पडली असली तरी गेल्या दोन वर्षांपासून पाऊस अपुरा पडत असल्याने अशी परिस्थिती ओढवलीय़
मांजरा धरणातून पंपांना पाणी मिळत नसल्याने जवळपास ८ महिन्यांपासून चर खोदून पाणी उपसा केला जात आहे़ मात्र, आता चर खोदूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा बंद होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़ पंप बंद पडू नये, यासाठी प्रशासनाकडून नालीतील गाळ, दगड काढून पंपापर्यंत पाणी आणले जात असले तरी प्रकल्पात पाणीच अत्यल्प असल्याने बिनदिक्कतपणे गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. पण आता त्यालाही मुकण्याची वेळ लातुरकरांवर आली आहे.
गढूळ अन् गाळाचे मिश्रण़़़
लातूर शहरातील काही भागात नळाला गढूळ व गाळमिश्रित पाणी येत आहे़ मांजरा प्रकल्पातील गाळातून येणाऱ्या पाण्याचे जलशुध्दीकरण यंत्रातही व्यवस्थित शुध्दीकरण होत नसल्याने गढूळ पाणीच पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे़ साठविलेल्या पाण्यासही वास येत आहे.
शहराला रोज लागते ४० एमएलडी पाणी...
लातूर शहरात सध्या दहा दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतो. दररोज ४० एमएलडी पाण्याची गरज असतानाही निव्वळ ३४ एमएलडी पाणी सोडले जाते. यात मांजरातून १६ एमएलडी आणि नागझरीतून १८ एमएलडी पाणी येते. पण मांजरातून १६ एमएलडी पाणी येणे बंद झाल्यास त्याचा अतिरिक्त भार नागझरीवर पडणार आहे.
सध्या नागझरीत एमजेपीच्या मते गाळधरुन ०.०१ दलघमी इतका पाणीसाठा आहे. त्यांच्या मते हे १५ दिवसातून एकदा पाणी दिल्यास हे पाणी जुलैै महिना पुरेल असे वाटते. परंतु यावर काहीजण सांशक आहेत. त्यामुळे लातूरकर फक्त पाऊसभरोसे आहेत. या दोन्ही धरणात पाणीसाठा वाढायला किमान १० दिवस चांगला पाऊस पडणे आवश्यक आहे.
-तर पंप बंद पडेल: कार्यकारी अभियंता सोनकांबळे
रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ मांजरा प्रकल्पातून पाणी उपसा करणाऱ्या पंपाला पाणी कमी पडत आहे़ चर खोदून गाळ, दगड काढण्यात येत आहे़त सर्व प्रयत्न केले तरी आता पाणी येणे कठीण झाले आहे़ आठवडाभरात पाऊस न झाल्यास काही वेळ बंद पडण्याची शक्यता आहे़ मांजरातील पाणी बंद पडल्यास नागझरी बॅरेजसमध्ये असलेल्या पाण्यावर शहराची तहान भागविणे भागणे मुश्कील आहे़ नागझरीतून १५ दिवसांतून एकवेळा पाणी पुरवठा करावा लागेल़ शहराची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला तरी पाऊस हाच एकमेव पर्याय उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सोनकांबळे यांनी सांगितले़

Web Title: Water will be stopped at any time from 'Manjra'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.