दहा गावांना पाणीटंचाईचे चटके
By Admin | Updated: June 7, 2014 00:23 IST2014-06-07T00:11:15+5:302014-06-07T00:23:40+5:30
लोहारा : तालुक्यातील जवळपास दहा गावांना सध्या टंचाईचे चटके बसत आहेत. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

दहा गावांना पाणीटंचाईचे चटके
लोहारा : तालुक्यातील जवळपास दहा गावांना सध्या टंचाईचे चटके बसत आहेत. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. टंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहण व कूपनलिकांचे प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु, त्या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या प्रकाराबाबत ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मागील वर्षी ४७ पैकी ४० गावांमध्ये १५० पेक्षा अधिक बोअरचे अधिग्रहण करण्यात आले होते. तसेच लोहाऱ्याला ४ व वडगावला (गां) २ टँकरने माकणी येथील निम्न तेरणा धरणातून पाणी पुरवठा करण्यात आला होता. यावर्षी टंचाईचे संकट गतवर्षीच्या तुलनेत कमी तीव्र आहे. असे असले तरी सध्या नऊ ते दहा गावे टंचाईने त्रस्त झाली आहेत. टंचाई निवारणार्थ सादर केलेले प्रस्ताव प्रशासनाकडून अद्याप मंजूर झाले नसल्याने या गावच्या प्राण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. विशेष म्हणजे परिसरातील बहुतांश प्रकल्प आटले आहेत. त्यामुळे टंचाईमध्ये अधिक भर पडत असल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)
चार प्रकल्प कोरडेठाक
लघु पाटबंधारे विभागांतर्गत सिंचन तलाव लोहारा (खुर्द), कानेगाव, मोघा (खुर्द), हिप्परगा सय्यद, तलाव लोहारा (खुर्द), मोघा (बु), माळेगाव, धानुरी, करवंजी, अचलेर, कास्ती (खुर्द), होळी, उदतपूर, बेंडकाळ, जेवळी, कानेगाव या बारा गावांतील सतरा पैकी जेवळी व कानेगाव या दोन तलावात मृतसाठा आहे. नागराळ, करजगाव, धानुरी, हराळी हे चारही प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.
‘माळेगावात’ १२.८७ % साठा
लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या लोहारा (बु) येथील तलावात २५ टक्के, धानुरी १२ टक्के पाणीसाठा आहे. हिप्परगा (खा) तलावातील पाणीपातळी जोत्याखाली आहे. बेलवाडी ३३.३३ टक्के, जेवळी ११.२५ टक्के, तर अन्य तलाव कोरडेठाक आहेत. भोसगा जोत्याखाली तर माळेगाव येथील तलावात १२.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडेठाक पडल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.