छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अनेक भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जलजीवन मिशनसह विविध पाणीपुरवठ्याच्या योजना कुचकामी ठरल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या ‘संवाद मराठवाड्याशी’ या ऑनलाईन उपक्रमात अनेक नागरिकांनी पाणीपुरवठ्यावरून बुधवारी ओरड केली.
टंचाईग्रस्त भागातील अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व यंत्रणांना दिले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत जेथे मागणी होईल तेथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा. पाणीटंचाईबाबत नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा, असेही आयुक्तांनी आदेशित केले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आगामी कालावधीत योजना गतीने पूर्ण केल्या तर टँकर व विहीर अधिग्रहण करण्याची गरज भासणार नाही. महानगरातील पाणी वितरणाबाबतचे नियोजन वेळापत्रकानुसार करावे. यामध्ये पाणी वितरणात जास्त अंतर असणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, डॉ. अनंत गव्हाणे, खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मजीप्राचे कार्यकारी अभियंता विजय कोळी उपस्थित होते.
नागरिकांनी केलेल्या तक्रारी अशा..परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे व्योमकेश यांनी जलजीवन मिशनच्या कामातील अडचणींचा पाढा वाचला. हिंगोलीतील वसमत येथून मारोती बनसोडे यांनी पाइपलाइनची गळती, नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथून संदीप वानखेडे यांनी गावातील अवैध पाणी वापर, बीड शहरातून डी. जी. तांदळे यांनी बीड शहर पाणीपुरवठा योजनेतील अडचणी, एन-७ सिडको छत्रपती संभाजीनगर येथील प्रणीत वाणी यांनी शहर पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाल्याची तक्रार केली. लातूर येथील अरविंद शिंदे यांनी खासगी टँकरच्या अडचणी मांडल्या. बैठकीतील अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईबाबत शासनाच्या वतीने सुरू केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
पिण्यासाठी राखीव पाणीसाठ्याची दक्षता घ्या...संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. पाणीटंचाई उपाययोजना करताना अल्प व दीर्घकालीन अशा दोन्ही उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करावे. विभागातील ज्या गावात सातत्याने टँकर लागतात तिथे पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी. पिण्यासाठी ठेवण्यात आलेला राखीव पाणीसाठ्याबाबत दक्षता घ्यावी.-दिलीप गावडे, विभागीय आयुक्त