एप्रिल महिन्यांत ४ ते ६ दिवसच पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:04 IST2021-04-30T04:04:42+5:302021-04-30T04:04:42+5:30
औरंगाबाद : एप्रिल महिन्यांत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांच्या घशाला कोरड दिली. शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, महिनाभरात केवळ ४ ...

एप्रिल महिन्यांत ४ ते ६ दिवसच पाणीपुरवठा
औरंगाबाद : एप्रिल महिन्यांत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांच्या घशाला कोरड दिली. शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, महिनाभरात केवळ ४ ते ६ दिवसच पाणीपुरवठा झाला आहे.
जलवाहिनी फुटणे, वीज नसणे यांसारख्या कारणांमुळे जुन्या भागासह सर्व शहराचे नियोजन फिसकटल्याचे सांगण्यात येत आहे.
पाणीपुरवठ्याचा पडलेला खंड भरून काढण्यासाठी काहीही प्रयत्न न झाल्यामुळे काही वसाहतींतील नागरिकांवर टँकर घेण्याची तर कुठे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. लॉकडाऊन असल्यामुळे पाण्याची मागणी वाढलेली असताना प्रशासकीय यंत्रणा कमी पडते आहे.
११५ वॉर्डांपैकी ७० टक्के वॉर्डांतच नळाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे पालिकेला शक्य आहे. उर्वरित वॉर्डांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. असे असतानाही पूर्ण शहराला चार दिवसांनीदेखील नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड नागरिक करीत आहेत.
पुंडलिकनगर जलकुंभावरून सातव्या दिवशी पुरवठा
पुंडलिकनगर जलकुंभावरून गुरुवारी पाणीपुरवठा करण्यात आला होता. गेल्या शुक्रवारी या भागातील वॉर्डांना पाणीपुरवठा झाला. गुरुवारी पहाटे ५ वाजता पाणीपुरवठ्याची वेळ होती. ६ वाजता पाणी आले आणि ६.४५ वाजता नळ गेले. महावितरण कंपनीच्या डीपीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले, परंतु मुळात जलकुंभातच पाणी कमी आले होते.
सिडको-हडकोतही पाण्याची बोंब
सिडको-हडकोतही पाणीपुरवठ्याची बोंब सुरू आहे. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या जम्बो शिष्टमंडळाने पालिका प्रशासकांची भेट घेऊन सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. त्यानंतरही खूप काही परिणाम झालेला नाही. एन-३, एन-४, गुरूसहानीनगर, पारिजातनगर मधील बहुतांश भागांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.
कार्यकारी अभियंत्यांची माहिती अशी
कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांना विचारले असता, या महिन्यांत जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. गुरुवारी काही भागांना कमी दाबाने पाणी दिले गेले. जायकवाडीकडून येणाऱ्या पाण्याला प्रेशर कमी होते, त्यामुळे कमी वेळ पाणी दिले गेले. सिडको-हडकोमुळे पुंडलिकनगर जलकुंभावरील पाणीपुरवठा कमी केलेला नाही, असा दावाही त्यांनी केला.