लातूर शहराला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करा
By Admin | Updated: April 8, 2016 00:25 IST2016-04-08T00:04:14+5:302016-04-08T00:25:56+5:30
लातूर : प्रशासनात नियोजनाचा अभाव असल्यामुळे लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईला मनपाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे.

लातूर शहराला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करा
लातूर : प्रशासनात नियोजनाचा अभाव असल्यामुळे लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईला मनपाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. नियोजन सुधारून समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने गुरुवारी मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रस्तुत मागणीसाठी ‘आप’ने मनपा प्रशासनाला साकडे घातले.
शाहू चौकातून सकाळी ११.३० वाजता आम आदमी पार्टीचा मोर्चा निघाला. आंदोलनकर्त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. शाहू चौक, अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, गांधी चौक मार्गे मनपा कार्यालयासमोर मोर्चा धडकला. महापुरुषांना अभिवादन करीत मनपाच्या ढिसाळ नियोजनाचा निषेधही आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला.
लातूर मनपाने पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने हाताळला नाही. त्यामुळे अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराच्या आमदारांनीही पाणीटंचाईकडे दुर्लक्ष केले. पाणीटंचाईबरोबर कचऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पाणी वाटपात भेदभाव केला जातो. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले नागरिक त्रस्त आहेत. घरमालकही त्रस्त आहेत.
सध्या घरमालक, घरभाडेकरू, मतदार, विरोधक असा पाणी वाटपात भेदभाव केला जात आहे. तसे न करता समन्यायी पद्धतीने सर्वांनाच पाणी द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)