पाणीपुरवठ्याचे आंदोलननाट्य फसले
By Admin | Updated: October 27, 2016 00:54 IST2016-10-27T00:40:47+5:302016-10-27T00:54:22+5:30
औरंगाबाद : स्थायी समितीमधील नगरसेवक आणि सभापती यांच्यात बुधवारपासून संघर्षाला सुरुवात झाली. स्थायी समितीच्या बैठकीला दांडी मारण्यासाठी

पाणीपुरवठ्याचे आंदोलननाट्य फसले
औरंगाबाद : स्थायी समितीमधील नगरसेवक आणि सभापती यांच्यात बुधवारपासून संघर्षाला सुरुवात झाली. स्थायी समितीच्या बैठकीला दांडी मारण्यासाठी सिडको-हडकोतील काही नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचे कारण देऊन सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले.
आंदोलनाची दखल प्रशासन घेत नसल्याचे कारण दाखवून युतीच्या नगरसेवकांनी थेट मनपा आयुक्तांसोबत ‘पंगा’ घेतला. आयुक्तांनीही नगरसेवकांचे नाट्य परतवून लावण्यासाठी शहरात अनधिकृत नळ कापण्याची मोहीम, शिवाजीनगर, पुंडलिकनगरचे पाणी कमी करण्यासोबत संपूर्ण शहराला दर चौथ्या दिवशी पाणी देण्याची घोषणा केली. आयुक्तांचा हा रौद्र अवतार पाहून नगरसेवकांना बॅकफुटवर यावे लागले.
सिडको-हडकोत दिवाळीच्या तोंडावर गरज नसतानाही मनपाने शट डाऊन घेतले. यानंतरही आम्हाला नागरिक पाण्यासाठी त्रास देत आहेत, असे आरोप करून नगरसेवक नितीन चित्ते, शिवाजी दांडगे, माधुरी अदवंत, मकरंद कुलकर्णी आदींनी सिडको एन-५ पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलन केले. नगरसेवकांचे दु:ख जाणून घेण्यासाठी कार्यकारी अभियंता एस. ए. चहल यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरसेवकांचे यानंतरही समाधान झाले नाही. सर्व नगरसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात पोहोचले. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया एका बैठकीत होते. नगरसेवकांचा अवतार अत्यंत रौद्र झाला होता. यावेळी थोडीशी टोकाची भूमिका घेता येत नाही, असे सांगितले.
संतप्त नगरसेवक तातडीने महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडे आले. त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनाही बोलावून घेतले. महापौरांनी आयुक्तांना आपल्या कक्षात बोलावून घेतले. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत तनवाणी यांनी सामंजस्याची भूमिका घेत पाणी प्रश्नात मार्ग काढावा, अशी विनंती केली. संतप्त नगरसेवक सिडको-हडकोतील अपुऱ्या, अनियमित पाण्याच्या मुद्यावर अडून बसले.