वाळूज एमआयडीसीतून ५ तालुक्यांना २०० टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 17:52 IST2019-01-19T17:52:43+5:302019-01-19T17:52:58+5:30
वाळूज एमआयडीसीच्या जलकुंभावरुन पाच तालुक्यांत जवळपास २०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

वाळूज एमआयडीसीतून ५ तालुक्यांना २०० टँकरने पाणीपुरवठा
वाळूज महानगर : औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याअभावी माणसांसह जनावरांचेही हाल होत असल्याने वाळूज एमआयडीसीच्या जलकुंभावरुन पाच तालुक्यांत जवळपास २०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे राज्यभरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची सर्वाधिक झळ औरंगाबाद जिल्ह्याला बसली आहे. औरंगाबाद तालुक्यासह वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, कन्नड या पाच तालुक्यांत अनेक भागात तीव्र पाणी टंचाई सुरु आहे. गावची लोकसंख्या, जनावरांची संख्या व पाणीटंचाई लक्षात घेवून त्यानुसार टँकर मंजूर करण्यात येतात. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत एमआयडीसीला दिला जातो. हा प्रस्ताव तपासून एमआयडीसी गरजेनुसार पाणी टँकर मंजूर करते.
त्यानुसार महाराणा प्रताप चौकालगत असलेल्या एमआयडीसीच्या जलकुंभावरुन १२० व अन्य जलकुंभावरुन ६० ते ७० टँकर असे जवळपास २०० टँकरने या पाच तालुक्यांतील टंचाईग्रस्त भागात दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. याच बरोबर एमआयडीसीच्या शेंद्रा येथील जलकुंभावरुनही औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील भागात दररोज १०० टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
या संदर्भात एमआयडीसीचे अभियंता दिलीप परळीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.