२०० प्रकल्पांमध्ये साडेबारा टक्के पाणीसाठा

By Admin | Updated: May 20, 2017 23:35 IST2017-05-20T23:32:44+5:302017-05-20T23:35:23+5:30

उस्मानाबाद :जिल्ह्यातील १९ प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित २०० प्रकल्पांमध्ये १२़६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे़

Water storage in 200 projects | २०० प्रकल्पांमध्ये साडेबारा टक्के पाणीसाठा

२०० प्रकल्पांमध्ये साडेबारा टक्के पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील १९ प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित २०० प्रकल्पांमध्ये १२़६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे़ तर ७३ प्रकल्पांची पाणीपातळी ही जोत्याखाली गेली आहे़ तर ९८ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांहूनही कमी पाणी उपलब्ध आहे़
मागील तीन ते चार वर्षे अल्प पर्जन्यमान झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना जिल्हावासियांना करावा लागला आहे़ टंचाई निवारणार्थ उपायोजना करताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले होते़ गतवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस परतीचा पाऊस दिलासादायक झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश सर्वच प्रकल्प तुडूंब भरले होते़ शिवाय जलयुक्तमधील नदी खोलीकरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता़ विशेष म्हणजे अनेक प्रकल्पांमधील गाळाचा उपसा केल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला होता़ सप्टेंबर २०१६ नंतरच्या आठ महिन्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यातील २०० प्रकल्पांमध्ये केवळ १२़६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ तर १९ प्रकल्प हे कोरडेठाक पडले आहेत़ ९८ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांहून कमी प्रमाणात पाणी शिल्लक आहे़ तर २५ प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पाणी आहे़ केवळ ४ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये पाणी उपलब्ध आहे़ जिल्ह्यातील २१९ प्रकल्पांपैकी १९ प्रकल्प कोरडेठाक आहेत़ उर्वरित प्रकल्पांमध्ये ६७६़७२७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ उपयुक्त पाण्याची टक्केवारी १२़६८ टक्के आहे़ मागील आठवड्यात १३़३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ एका आठवड्यात प्रकल्पांमधील ०.६३ टक्के पाण्याचा झाला. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ०.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा साठा मुबलक असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे़

Web Title: Water storage in 200 projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.