पाण्यासाठी दाहीदिशा

By Admin | Updated: June 6, 2014 01:10 IST2014-06-06T00:58:50+5:302014-06-06T01:10:58+5:30

औरंगाबाद : महावितरण आणि महापालिकेच्या ढिसाळ यंत्रणेमुळे शहरात तीन दिवसांपासून पाणीटंचाई सुरू आहे. पाणीपुरवठ्याचे

Water to the right | पाण्यासाठी दाहीदिशा

पाण्यासाठी दाहीदिशा

औरंगाबाद : महावितरण आणि महापालिकेच्या ढिसाळ यंत्रणेमुळे शहरात तीन दिवसांपासून पाणीटंचाई सुरू आहे.
पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडण्यामागे महावितरणकडून वीजपुरवठा होत नसल्याचे कारण मनपाने जाहीर केले आहे, तर महावितरण कंपनी सूत्रांनी पालिकेच्या वितरण यंत्रणेवर बोट ठेवले आहे. दोन्ही संस्थांच्या ‘तू-तू-मैं-मैं’मध्ये नागरिकांना पाण्यासाठी महागडे टँकर्स घ्यावे लागले. हातपंपावर पाण्यासाठी धावपळ करावी लागली, तर काही नागरिकांनी हर्सूल तलावातून हातगाडी, रिक्षाने पाणी आणले. ज्यांच्याकडे ‘वॉटर स्टोरेज’ होते त्यांना पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र, गुंठेवारी वसाहतींसह काही मध्यमवर्गीय भागांमध्ये पाणीटंचाई दिसून आली. पाणीटंचाईच्या विरोधात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या दालनासमोर आघाडी नगरसेवकांनी निदर्शने करून घोषणाबाजी केली, तर नगरसेवक कृष्णा बनकर यांनी मनपा प्रवेशद्वारावर मोर्चा काढून धरणे दिले.
खाजगी पाणी टँकरचा धंदा तेजीत
औरंगाबाद : शहरात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे खाजगी टँकरवाल्यांचा कॉलनी, नगर, सोसायटीत पाण्याचा बाजार तेजीत आहे.
मनपाचे ८० टँकर शहराच्या विविध कॉलनी, झोपडपट्टी, सिडकोच्या उच्चभ्रू वसाहतीत फेर्‍या मारत असून, ज्या भागात मनपाचे टँकरही येत नाही अन् पाणीपुरवठाही होत नाही, अशा ठिकाणी खाजगी टँकरला आजही मोठी मागणी आहे. परिसरातील विंधन विहिरींनी तळ गाठल्यामुळे सर्वांची भिस्त टँकरच्या पाण्यावरच आहे. गारखेडा, मुकुंदवाडी, चिकलठाणा, पडेगाव, भावसिंगपुरा, सिडको, हडको, नक्षत्रवाडी, कांचनवाडी आदी भागही पाणीटंचाईतून सुटलेला नाही.
नगरसेवकाकडून मारहाण
भाजपाचे नगरसेवक बबन नरवडे यांनी कोटला कॉलनी येथील टँकरचालकाला मारहाण केल्याने मनपा सेवेत असलेल्या खाजगी टँकरचालकांनी संप पुकारला. एन-५ आणि कोटला कॉलनी येथे दुपारी २ वाजेपासून टँकर उभे होते.
या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात टँकरचालकांनी एक तक्रारही दिली आहे. या प्रकरणी नगरसेवक नरवडे यांना विचारले असता ते म्हणाले की भाग्यनगर, समतानगर, शांतीनगरमध्ये महिन्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. अभियंते, लाईनमन याची दखल घेत नाहीत. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी होती. मात्र, टँकरचा पाणीपुरवठादेखील कोलमडला होता. त्यामुळे टँकरचालकांसोबत हुज्जत झाली. मारहाण केली नसल्याचा दावा त्यांनी केला.
नगरसेवकांचा ठिय्या
पाणीपुरवठा कोलमडल्यामुळे माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफरखान, प्रमोद राठोड, काशीनाथ कोकाटे, रवी कावडे, रावसाहेब गायकवाड, गटनेते मीर हिदायत अली यांनी दुपारी ३ वा. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या दालनासमोर हंडे घेऊन ठिय्या दिला.
नगरसेवकांनी जोरदार घोषणा देऊन दालन परिसर दणाणून सोडला. उपायुक्त रवींद्र निकम यांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आयुक्त येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा मनोदय नगरसेवकांनी व्यक्त केला.
मनपासमोर धरणे
नगरसेवक कृष्णा बनकर यांनी मनपा प्रवेशद्वारासमोर मोर्चा काढून धरणे दिले. यामध्ये शेकडो महिलांचा समावेश होता.
मागील अडीच महिन्यांपासून भीमनगर, भावसिंगपुरा वॉर्डात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.
महापौर, शहर अभियंत्यांकडे तक्रार करूनही पाणीपुरवठा होत नसल्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे बनकर यांनी सांगितले.
या भागात पाणीटंचाई
४गुंठेवारीच्या ११८ वसाहती, सिडको- हडकोतील २२ वॉर्ड, जुन्या शहरातील काही भागांत आज पाणीटंचाई जाणवली.
४हर्सूल तलावावर अवलंबून असलेल्या १८ वॉर्डांना पाणीपुरवठा होऊ शकला.
टँकर्सवाल्यांची चांदी
मनपाव्यतिरिक्त सुमारे ७०० टँकर्स खाजगी पुरवठादारांचे आहेत. १२ हजार, १० आणि ८ व ४ हजार लिटर्सच्या टँकरने ते हॉटेल, हॉस्पिटल्ससाठी पाणीपुरवठा करतात. ४०० रुपये ते ४ हजार रुपयांपर्यंत टँकर्सचा भाव आहे. ११८ गुंठेवारी वसाहतींमध्ये मनपाच्या टँकर्सने पाणीपुरवठा होतो.

Web Title: Water to the right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.