आरोग्य केंद्रांत पाण्याचा ठणठणाट
By Admin | Updated: December 2, 2014 00:43 IST2014-12-02T00:43:49+5:302014-12-02T00:43:49+5:30
संजय तिपाले ,बीड जिल्ह्यातील पाणीटंचाईचा फटका केवळ गावानांच बसला आहे असे नाही तर ग्रामीण आरोग्याचा कणा मानल्या जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही झळ पोहोचली आहे़

आरोग्य केंद्रांत पाण्याचा ठणठणाट
संजय तिपाले ,बीड
जिल्ह्यातील पाणीटंचाईचा फटका केवळ गावानांच बसला आहे असे नाही तर ग्रामीण आरोग्याचा कणा मानल्या जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही झळ पोहोचली आहे़ पाण्याअभावी ५० पैकी तब्बल ३८ आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णसेवेत अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत़ त्यामुळे जिल्हा परिषदेने सुमारे ५७ लक्ष रूपयांच्या कूपनलिकांचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला आहे़
जिल्ह्यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे असून या अंतर्गत येणाऱ्या दोन हजारांवर गावांना आरोग्य सुविधा पुरविली जाते़ मात्र आरोग्य केंद्रे उभारताना बहुतांश ठिकाणी पाण्याची सोय करण्यात आली नव्हती़ काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली होती़ जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे़ अशा परिस्थितीत आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना देखील पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़
या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रांमध्ये कायमस्वरूपी पाण्याची सुविधा व्हावी, यासाठी ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नवीन बोअरवेल घेण्यात येणार आहेत़ त्यासाठी प्रत्येकी दीड लाख रूपयांप्रमाणे एकूण ५७ लक्ष रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ पाणी सुविधेचा हा प्रस्ताव जि़ प़ च्या आरोग्य विभागाने सीईओ नामदेव ननावरे यांच्यामार्फत कुटुंब कल्याण आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांकडे ठेवला आहे़ या प्रस्तावाला मंजुरी मिळताच पाणीटंचाईचा प्रश्न निकाली लागणार आहे़ रूग्णांची अडचण होऊ नये म्हणून तात्पुरती व्यवस्था असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांनी सांगितले़
या केंद्रांमध्ये आहे पाणीटंचाई
केज तालुक्यातील युसूफ वडगाव, विडा, चिंचोलीमाळी, बनसारोळा, आडस, आष्टी तालुक्यातील धामणगाव, कडा, सुलेमान देवळा, टाकळसिंग, पाटोदा तालुक्यातील वाहली, डोंगरकिन्ही, नायगाव, अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव, घाटनांदूर, भावठाणा, उजनी, गेवराई तालुक्यातील चकलांबा, तलवाडा, मादळमोही, उमापूर, निपाणी जवळका, जातेगाव, बीड तालुक्यातील येळंबघाट, चौसाळा, नाळवंडी, लिंबागणेश, नवगण राजुरी, ताडसोन्ना, माजलगाव तालुक्यातील पात्रूड, टाकरवण, किट्टी आडगाव, गंगामसला, परळी तालुक्यातील धर्मापुरी, नागापूर तसेच वडवणी व शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बोअरवेल प्रस्तावित आहेत़