पाणीसाठा संपला, आता पावसाकडे लक्ष
By Admin | Updated: June 16, 2014 01:11 IST2014-06-16T00:56:00+5:302014-06-16T01:11:27+5:30
औरंगाबाद : उन्हाळा संपताच विभागातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा संपत आला आहे.

पाणीसाठा संपला, आता पावसाकडे लक्ष
औरंगाबाद : उन्हाळा संपताच विभागातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा संपत आला आहे. मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी २५ टक्के एवढाच पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे वेळेवर पाऊस न झाल्यास विभागात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात अवघे ५ टक्के पाणी उरले आहे.
मराठवाड्यात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणच्या लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला होता. मात्र, गेल्या आठ महिन्यांत हा साठा संपत आला आहे. सध्या मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघा २६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
लघु प्रकल्पांची अवस्था त्याहूनही वाईट आहे. लघु प्रकल्पांमध्ये सरासरी १८ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.
मध्यम प्रकल्पांमध्ये ४६ टक्के साठा आहे. याशिवाय गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये सरासरी ४६ टक्के आणि मांजरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये १५ टक्के पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यातील प्रकल्पांची क्षमता ७९०३ दलघमी आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पांमध्ये मिळून केवळ १९९० दलघमी पाणी शिल्लक आहे.
मराठवाड्यात ७५ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्येही सरासरी २६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सर्व प्रकल्पांची क्षमता ९३४ दलघमी असून सध्या त्यात २४६ दलघमी पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ६६ दलघमी पाणी सध्या उपलब्ध आहे. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात ४९ आणि लातूर जिल्ह्यात ४२ दलघमी पाणी उपलब्ध आहे. लघु प्रकल्पांची अवस्थाही सर्वात वाईट आहे. विभागात ७१८ लघु प्रकल्प असून त्यांची क्षमता १५२२ दलघमी आहे. मात्र, सध्या त्यात अवघे १८ टक्के पाणी उरले आहे. पावसाळा लांबल्यास हा साठा घटून पाणीटंचाई अधिक भीषण होणार आहे.
मराठवाड्यात ११ मोठे प्रकल्प आहेत. यापैकी मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे तीन प्रकल्प कोरडे पडले आहेत. या प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठा शून्य टक्के आहे.
ऊर्ध्व पेनगंगा धरणात सर्वाधिक ५७ टक्के पाणी आहे, तर येलदरी धरणात ४६ टक्के, सिद्धेश्वर धरणात ३३ टक्के, माजलगाव धरणात ११ टक्के, निम्न मनार प्रकल्पात २६ टक्के, विष्णुपुरी प्रकल्पात २७ टक्के, तर आजघडीला निम्न दुधना प्रकल्पात ३९ टक्के पाणीसाठा उरला आहे.