पाणीपातळी खालावली
By Admin | Updated: April 8, 2017 21:37 IST2017-04-08T21:36:21+5:302017-04-08T21:37:11+5:30
गढीएप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, जलाशयातील साठाही दिवसेंदिवस कमी होत आहे.

पाणीपातळी खालावली
विष्णू गायकवाड गढी
एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, जलाशयातील साठाही दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पाण्याची तीव्र समस्या निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे.
पाझर तलाव कोरडे पडल्यामुळे ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये आतापासूनच पाण्याची समस्या बिकट होण्याची भीती निर्माण झाली आहे. बहुतांश विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेली असून, त्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना आतापासूनच पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक गावांतील हातपंपातून पाणी येत नाही. नद्या-नाले कोरडे पडल्यामुळे पाण्याची समस्या अधिकच बिकट होणार आहे.
पाणीसाठे संपुष्टात येण्याची चिन्हे दिसून येत असल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण रूप धारण करणार आहे. पाणी समस्या निवारण्यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत असले तरी बऱ्याच ठिकाणी आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, असा प्रश्न आहे. वाढते तापमान आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, जलाशयातील पाण्याचा साठा संपुष्टात येत आहे. एकीकडे उन्हाची तीव्र दाहकता, तर दुसरीकडे पाण्याची टंचाई आणि जनावरांसाठी वैरण नसल्याने शेतकरी आपली जनावरे विकत आहेत.
शेतकऱ्यांजवळ जनावरांना पिण्यासाठी पाणी व वैरण नाही त्यामुळे जनावरांना द्यावे तरी काय, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.खरीप हंगामात शेतीच्या लागवडीसाठी लागणाऱ्या बी-बियाणे खरेदीला पैसे नाहीत. त्यातच ही समस्या निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आतापासूनच पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत असले तरी प्रशासन मात्र अजूनही सुस्त आहे.