कांद्याने आणले नाशिक येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
By Admin | Updated: February 8, 2016 00:14 IST2016-02-07T23:56:23+5:302016-02-08T00:14:16+5:30
हसनाबाद : परिसरात सध्या विहिरींनी तळ गाठल्याने कांदा लागवडीसाठी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून आलेल्या २५ शेतकऱ्यांंना याचा फटका बसला आहे.

कांद्याने आणले नाशिक येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
हसनाबाद : परिसरात सध्या विहिरींनी तळ गाठल्याने कांदा लागवडीसाठी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून आलेल्या २५ शेतकऱ्यांंना याचा फटका बसला आहे.
हसनाबाद परिसरातील जमीन कांदा लागवडीसाठी चांगली असल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक शेत एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली आहे. परंतु अपुऱ्या पाण्यामुळे कांदा पीक धोक्यात आल्याने कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नाशिक परिसरात खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी पातळी खालावली होती. त्याचा फटका रबीतील पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांकडे कांदा पिकांचे लाखो रुपयांचे रोपे तयार होती. परंतु पाण्याअभावी रोपांची लागवड शेतकऱ्यांना करता आली नाही. भोकरदन तालुक्यातील जमीन कांदा पिकासाठी चांगली असल्याने आम्ही घरदार सोडून दोन महिन्यांपासून हसनाबाद परिसरात येऊन कांदा पिकाची लागवड केली. यासाठी लाखो रूपयांचा खर्च आल्याचे शेतकरी गोरख उंडे यांनी सांगितले. पिकाला दीड महिना पाणी मिळाले. परंतु पीक जोमात येण्यासाठी सध्या कांदा पिकाला पाण्याची गरज आहे. परंतु परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळीने तळ गाठल्याने दोनशे एकर वरील कांदा पीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. परिसरातील लतीफपूर, सिरसगाव वाघु्रळ, वेटा, बोरगाव खडस, घोसेगाव आदी परिसरात बटईने शेती करून कांद्याची लागवड करण्यात आली. परंतु आत्ता पाण्याअभावी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणल्याचे येवला तालुक्यातील पिंपळखुटे येथील शेतकरी रतीलाल तुळशीराम उंडे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. कांदा शेतकरी संकटात सापडल्याने प्रशासनाने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)