बंदिस्त पाईपलाईनद्वारे थेट बांधावर पाणी
By Admin | Updated: August 26, 2014 00:29 IST2014-08-26T00:29:20+5:302014-08-26T00:29:20+5:30
परंडा : उजनी धरणातून बोगदामार्गे सीना नदीत पाणी येते. हे पाणी शिराळा बंधाऱ्यात अडवून तेथून बंदिस्त पाईपलाईनद्वारे परंडा तालुक्यातील सुमारे २८५० हेक्टर क्षेत्रावर पोहोचविणाऱ्या

बंदिस्त पाईपलाईनद्वारे थेट बांधावर पाणी
परंडा : उजनी धरणातून बोगदामार्गे सीना नदीत पाणी येते. हे पाणी शिराळा बंधाऱ्यात अडवून तेथून बंदिस्त पाईपलाईनद्वारे परंडा तालुक्यातील सुमारे २८५० हेक्टर क्षेत्रावर पोहोचविणाऱ्या महत्वकांक्षी शिराळा उपसासिंचन योजनेला सोमवारी मुहुर्त मिळाला. योजना कार्यान्वीत झाल्याने परंडा तालुक्याची हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल होणार असून, याचा सुमारे दहा गावांना फायदा होणार आहे.
परंडा तालुक्यातील शिराळा, वडनेर, लोहारा, आवारपिंपरी, ढगपिंपरी, आसु, लोणी, नालगाव, कपिलापुरी हा परिसर अवर्षणग्रस्त म्हणूनच ओळखला जात होता. त्यामुळेच या भागातील क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शिराळा उपसासिंचन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने १० जून १९९९ रोजी २३ कोटीच्या या महत्वकांक्षी योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. त्यानंतर २४ सप्टेंबर २००८ मध्ये या कामास मंजुरी घेण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील लाभक्षेत्र सर्वे करून सिंचनासाठी मुख्य कालवा व वितरण व्यवस्था पाईपलाईनद्वारे केल्यामुळे २००८-०९ मध्ये नवीन सूचीद्वारे या योजनेच्या अंदाजपत्रकात वाढ होऊन योजनेची अद्ययावत किंमत १०२.३९ कोटी वर पोहोचली.
चार वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. सद्यस्थितीत ७५ कोटी रुपये खर्चण्यात आले असून, या योजनेच्या माध्यमातून उजनी धरणाचे पाणी बोगद्यामार्गे सीना नदीत आणून ते शिराळा बंधाऱ्यात अडविण्यात आले असून, तेथून ते थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बंदिस्त पाईपलाईनद्वारे पोहोचविण्यात येणार आहे. याकरिता लाभ क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर आधुनिक पद्धतीने कॉक काढण्यात आले असून, सोमवारी योजनेचे लोकार्पण आ. राहुल मोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक एस. व्ही. उपासे, महामंडळाचे अभियंता पी. जी. घोलप, अधीक्षक अभियंता ए. डी. कोकाटे, कार्यकारी अभियंता एम. आर. आवलगावकर आदी अधिकारी तसेच राकाँ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
२००८-०९ मध्ये सिंचनासाठी मुख्य कालवा व वितरण व्यवस्था पाईपलाईनद्वारे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या योजनेची अद्ययावत किंमत १०२.३९ कोटी इतकी अपेक्षित होती. प्रत्यक्षात ७५ कोटीमध्येच ही योजना कार्यान्वीत करण्यात यश आले आहे. या योजनेअंतर्गत बंधाऱ्यातील पाणी ५८ मीटर उंचीपर्यंत उपसा करून वापरण्यात येणार आहे. यासाठी ५२५ एचपीचे दोन विद्युतपंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपसा सिंचन कार्यक्षेत्राचेही चार विभाग करण्यात आले असून, २८५० हेक्टर क्षेत्राला याचा थेट लाभ होणार आहे तर या जमिनीवर उत्पादित होणाऱ्या उत्पादनातून तब्बल २५० कोटीची उलाढाल होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.