५२ लाख लोकांना पाणी
By Admin | Updated: May 4, 2016 01:28 IST2016-05-04T01:19:05+5:302016-05-04T01:28:12+5:30
औरंगाबाद : पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षीही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे. टँकरने पाणीपुरवठा हा एकमेव पर्याय प्रशासनाकडे शिल्लक राहिल्याने

५२ लाख लोकांना पाणी
औरंगाबाद : पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षीही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे. टँकरने पाणीपुरवठा हा एकमेव पर्याय प्रशासनाकडे शिल्लक राहिल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच ५२ लाख लोकांना ३३३८ टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. मे अखेरपर्यंत हा आकडा ४ हजारांपर्यंत जाण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ५०० गावे, १२ लाख लोकसंख्या आणि ५०० टँकरची वाढ झाली आहे. यंदाचा दुष्काळ मागच्या वर्षीच्या तुलनेत भयावह असल्याचे आकड्यांवरून दिसते.
पारा ४२ डिग्रीसेल्सिअसच्या पुढे-मागे सरकत असल्यामुळे पाण्याचे साठे आटू लागले आहेत. मराठवाड्यातील सुमारे ५२ लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. २ हजार ५०३ गावांना ३३३८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत १२३ गावे आणि १६४ टँकर वाढले आहेत. वैशाख महिना अजून जायचा आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वणवण करावी लागणार हे निश्चित आहे. विभागातील २५०३ गावांना टँकरचे पाणी पुरविले जात असून नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागत आहे. १९२५ गावांसाठी ४६८९ विहिरी विभागीय प्रशासनाच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. मेच्या पहिल्या आठवड्यातच ५०० गावे नव्याने दुष्काळाच्या गर्तेत आली आहेत.
गेल्या महिन्यात २ हजार ६० गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. सद्य:स्थितीत २५०३ गावांत टँकरचे पाणी दिले जात आहे. वाढलेल्या गावांतील ११ लाख लोकसंख्येची त्यात भर पडली आहे. ५९३ टँकर वाढले आहेत.
विभागात बीड जिल्ह्यातील ६७१ गावांत १२ लाख ७० हजार १२२ नागरिकांना ८६६ टँकरने, औरंगाबाद जिल्ह्यातील ५६९ गावांतील ११ लाख ६१ हजार ९४९ नागरिकांना ७५८ टँकरने, जालना जिल्ह्यातील ४०३ गावांना व ७ लाख ८५ हजार ८२२ नागरिकांना ४८० टँकरने, उस्मानाबाद जिल्ह्यातील २४६ गावांतील ५ लाख ३३ हजार ७७२ नागरिकांना ३७९ टँकरने पाणीपुरवठा होतो आहे, तर लातूर जिल्ह्यातील ३ लाख ६२ हजार नागरिक व २१० गावांत २८१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.