कोरोना संकटात घाटीत परिचारिकांचा कामबंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:05 IST2021-04-21T04:05:37+5:302021-04-21T04:05:37+5:30
औरंगाबाद : घाटीत कोरोना रुग्णांसाठी नवीन कक्ष आणि खाटा वाढविण्यात येत आहेत. परंतु आवश्यक परिचारिकांचे मनुष्यबळ भरले गेलेले ...

कोरोना संकटात घाटीत परिचारिकांचा कामबंदचा इशारा
औरंगाबाद : घाटीत कोरोना रुग्णांसाठी नवीन कक्ष आणि खाटा वाढविण्यात येत आहेत. परंतु आवश्यक परिचारिकांचे मनुष्यबळ भरले गेलेले नाही. त्यामुळे कार्यरत परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे २६ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेने दिला आहे.
घाटीत कोरोना आणि इतर नियमित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोना रुग्णांसाठी नवीन कक्ष उघडण्यात येत आहे. खाटा वाढविण्यात येत आहेत. त्यामुळे परिचारिकांवर कामाचा भार वाढला आहे. त्यातून रुग्णसेवा देताना परिचारिका कोरोनाने बाधित होत आहेत. नवीन कक्ष उघडण्यास, खाटा वाढविण्यास विरोध नाही. परंतु त्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ वाढवावे, ही मागणी आहे. प्रशासनाला वारंवार ही बाब निदर्शनास आणून दिली. परंतु त्याकडे दुर्लक्ष हाेत आहे. त्यामुळे परिचारिका २६ एप्रिलपासून कामबंद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती संघटनेच्या सचिव इंदुमती थोरात यांनी दिली.