"तुम्ही इथे का आलात?"; चंद्रकांत खैरेंचा रशीद मामूंच्या उमेदवारीला ठाम विरोध, म्हणाले,"तिथे जाणार पण नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 18:27 IST2025-12-22T18:02:23+5:302025-12-22T18:27:18+5:30
Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Election: छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी महापौर रशीद मामू यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ...

"तुम्ही इथे का आलात?"; चंद्रकांत खैरेंचा रशीद मामूंच्या उमेदवारीला ठाम विरोध, म्हणाले,"तिथे जाणार पण नाही"
Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Election: छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी महापौर रशीद मामू यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील प्रवेशाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रवेशामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे कमालीचे संतप्त झाले असून, त्यांनी थेट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरच तोफ डागली आहे. "दंगल घडवणाऱ्या व्यक्तीला पक्षात स्थान देणे ही मोठी चूक आहे, त्यांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळू देणार नाही," असा आक्रमक पवित्रा खैरेंनी घेतला.
रशीद मामू यांच्या प्रवेशाला विरोध करताना खैरेंनी १९८६ च्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून दिली. "१६ जानेवारी १९८६ रोजी शिवसेनेने समान नागरी कायद्यासाठी पहिला मोर्चा काढला होता. "या मोर्चावर दगडफेक घडवून आणण्यात रशीद मामू यांचा हात होता. आम्ही ती दगडं खाल्ली आहेत. अशा माणसाला पक्षात घेतल्याने हिंदूंची ५० हजार मतं कमी होतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कदाचित हा इतिहास माहिती नसावा, म्हणून अजाणतेपणी हा प्रवेश झाला असेल," असा खैरेंचा आरोप आहे.
सोमवारी रशीद मामू हे चंद्रकांत खैरे यांची भेट घेण्यासाठी सेनाभवनावर आले होते. मात्र, खैरे यांनी त्यांना पाहताच आपला संताप व्यक्त केला. "माझा तुम्हाला ठाम विरोध आहे, तुम्ही इथे का आलात?" असे म्हणत खैरेंनी त्यांना तिथून जाण्यास सांगितले. दोघं आमने सामने येताच खैरे म्हणाले की, "माझा तुला उमेदवारी देण्यास विरोध आहे, उमेदवारी मिळू देणार नाही" या घटनेनंतर शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दानवेंवर गाफील ठेवल्याचा आरोप
अंबादास दानवे यांनी आपल्याला कोणतीही कल्पना न देता रशीद मामू यांचा प्रवेश घडवून आणल्याचा दावा खैरेंनी केला आहे. "आमच्या एका नेत्याने त्यांना बोलावले, ते स्वतःच काहीतरी वेगळे करत असतात. अनेकांनी मला फोन करून या प्रवेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लीम नगरसेवकांना आमचा विरोध नाही, पण ज्यांनी दंगलीसाठी मदत केली त्यांना शिवसेनेत स्थान नसावे," असे खैरे म्हणाले.
उमेदवारीसाठी 'निवृत्त पोलीस अधिकाऱ्या'चा पर्याय
रशीद मामू यांना तिकीट देण्यास खैरेंनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यांच्या जागी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव चर्चेत असल्याचे संकेत खैरेंनी दिले. "आमच्याकडे एक निवृत्त पोलीस अधिकारी आले आहेत, त्यांना तिकीट देण्याचा आमचा विचार आहे. रशीद मामूंना तिकीट देण्याचा प्रयत्न केला तर मी तिथे जाणार नाही. मी सांगेल माझा विरोध आहे," असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
विरोधकांकडून टीका
या वादाचा फायदा घेत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. रशीद मामू यांच्या प्रवेशानंतर शिरसाट यांनी या गटाला उबाठा मामू पक्ष असे म्हटले.