जम्मू-काश्मीर, लेह-कारगिलमध्ये लवकरच वक्फ बोर्डांचे गठन

By | Updated: December 5, 2020 04:07 IST2020-12-05T04:07:36+5:302020-12-05T04:07:36+5:30

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर व लेह-कारगिलमध्ये लवकरच वक्फ बोर्डांचे गठन करण्यात येणार आहे. यासाठी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे, ...

Waqf Boards soon to be formed in Leh-Kargil, Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीर, लेह-कारगिलमध्ये लवकरच वक्फ बोर्डांचे गठन

जम्मू-काश्मीर, लेह-कारगिलमध्ये लवकरच वक्फ बोर्डांचे गठन

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर व लेह-कारगिलमध्ये लवकरच वक्फ बोर्डांचे गठन करण्यात येणार आहे. यासाठी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.

नक्वी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय वक्फ परिषदेची बैठक झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, कलम २७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर व लेह-कारगिलमध्ये प्रथमच गठित होणाऱ्या वक्फ बोर्डांकडून वक्फ संपत्तीचा सदुपयोग होईल, हे सुनिश्चित केले पाहिजे. याचा उपयोग सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक उपक्रमांसाठी करण्यासाठी पंतप्रधान लोकविकास कार्यक्रमातून भरघोस मदत केली जाणार आहे.

जम्मू-काश्मीर व लेह-कारगिलमध्ये हजारो वक्फ मालमत्ता आहेत. त्यांची नोंदणी सुरू आहे. त्यांचे डिजिटलायझेशन व जिओ टॅगिंग-जीपीएस मॅपिंग करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. ते लवकरच पूर्ण होईल.

राज्यातील वक्फ मालमत्तांमध्ये फेरफार व माफियांकडून कब्जा केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करून राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे की, अशा दोषींच्या विरोधात कारवाई करावी, तसेच मालमत्तांची सुरक्षा व सदुपयोग सुनिश्चित करावी. यासाठी केंद्रीय वक्फ परिषदेचे पथक संबंधित राज्यांचा दौरा करणार आहे.

नक्वी म्हणाले की, पंतप्रधान लोकविकास कार्यक्रमांतर्गत देशाच्या अन्य भागांप्रमाणेच जम्मू-काश्मीर, लेह-कारगिलमध्ये वक्फ मालमत्तांवर सरकारकडून शाळा, महाविद्यालये, आयटीआय, मुलींची वसतिगृहे, निवासी शाळा, कौशल विकास केंद्र, बहु-उद्देशीय सामुदायिक केंद्र, सद्भाव मंडप, हुनर हब, रुग्णालये, व्यावसायिक केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर आदी मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात येणार आहेत. मूलभूत सोयीसुविधांच्या निर्मितीद्वारे गरजूंना विशेषत मुलींना शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा व युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशभरात वक्फ मालमत्तांवर शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सामुदायिक भवन आदींची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान लोकविकास कार्यक्रमांतर्गत शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही नक्वी म्हणाले.

अल्पसंख्यकांसाठी देशातील ९० जिल्ह्यांतच सीमित असलेल्या विकास योजनांचा विस्तार पंतप्रधान लोकविकास कार्यक्रमांतर्गत ३०८ जिल्हे, ८७० ब्लॉक, ३३१ शहरे, हजारो गावांपर्यंत केला आहे. या योजनेचा लाभ समाजाच्या सर्व वर्गांना होत आहे.

.........

६ लाख ६४ हजार पंजीकृत वक्फ मालमत्ता

देशात सुमारे ६ लाख ६४ हजार पंजीकृत वक्फ मालमत्ता आहेत. सर्व ३२ राज्ये वक्फ बोर्डांचे शंभर टक्के डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर वक्फ मालमत्तांचे जिओ टॅगिंग-जीपीएस मॅपिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ३२ राज्य वक्फ बोर्डांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

..........

गुजरातेत कोरोनाचे १,५१० नवे रुग्ण

अहमदाबाद - गुजरातेत शुक्रवारी कोरोनाचे १,५१० नवे रुग्ण आढळले असून, याबरोबरच एकूण रुग्णांची संख्या २,१५,८१९ वर गेली आहे. राज्यात २४ तासांत १८ रुग्णांचे मृत्यू झाले असून, एकूण मृतांची संख्या ४,०४९ झाली आहे. याचबरोबर १,६२७ रुग्णांना घरी जाऊ देण्यात आले आहे. राज्यात बरे झालेल्यांची संख्या १,९६,९९२ झाली आहे.

पंतप्रधान सोमवारी पायाभरणी करणार

आग्रा (उत्तरप्रदेश) - आग्रा येथील मेट्रो प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सात डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर हजर राहणार आहेत. सध्या या समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. जगप्रसिद्ध ताजमहालच्या पूर्व गेटसमोर ड्रिल मशीनद्वारे प्रकल्पाचा शीलान्यास समारंभ होईल.

काश्मिरमध्ये उमेदवारावर हल्ला

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारावर अतिरेक्यांनी हल्ला केला असून, त्यात अनीसूल इस्लाम गनी जखमी झाले आहेत.या निवडणुकीतील हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे. मनी हेअनंतवाग जिल्ह्यातून अपना पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत. त्यांचा हात व पायावर जखमा झाल्या आहेत.

बसखाली चिरडून तीन बालके ठार

मुजफ्फरनगर - भरधाव बसखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला व बसची वाट पाहणाऱ्या तिघांचा अंत झाला. या अपघातात तीन महिला व दोन बालके गंभीर जखमी झाले आहेत. बसच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

९५ किलो अंमली पदार्थ जप्त

जम्मू - ९५ किलो अंमली पदार्थांसह दोन तस्करांना जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात गजाआड करण्यात आले. ते दोघेही पंजाबचे रहिवासी आहेत. गुप्त खबर मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने एका धावत्या वाहनाला थांबविले व झडती घेतली असता हा माल सापडला. दोघांचीही चौकशी केली जात आहे.

कोरोनाच्या काळात निवडणुका नाही

अमरावती - कोरोना महामारी उद्रेकाच्या काळात राज्यात निवडणुका घेऊ नयेत, असा ठराव आंध्र प्रदेश विधानसभेने पास केला. फेब्रुवारी २०२१मध्ये निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा विचार करीत असताना हा ठराव करण्यात आला आहे.

केलाँगचे तापमान उणे ६.७ अंश

सिमला - हिमाचल प्रदेशातील केलाँगचे तापमान शुक्रवारी सर्वांत कमी म्हणजे उणे ६.७ अंश नोंदले गेले. राज्याच्या पर्वतीय आणि मध्यम उंचीच्या भागात पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. किन्नौर जिल्ह्यात कल्पा येथे ०.१ तापमानाची नोेंद झाली.

महिलांसाठीची रेल्वे सुरू ठेवणार

चेन्नई - वर्दळ नसलेल्या काळात अत्यावश्यक सेवेतील महिलांसाठीच्या उपनगरीय रेल्वेगाड्या सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेन्नईमध्ये उपनगरीय रेल्वेगाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार ते शनिवार या दिवसांमध्ये जास्त महिलांना प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे.

.........

अमेरिका भारताला ९ कोटी डॉलरची लष्करी सामग्री व सेवा विक्री देणार

वॉशिंग्टन : अमेरिकेने आपल्या सी-१३० सुपर हर्क्युलस सैन्य परिवलन विमानांच्या ताफ्यांच्या स्वरूपात भारताला ९ कोटी डॉलरच्या लष्करी सामग्री व सेवांची विक्री यास मंजुरी दिली आहे.

संरक्षण खात्याच्या संरक्षण सुरक्षा सहयोग एजन्सीने (डीएससीए) सांगितले की, ही प्रस्तावित विक्री अमेरिका-भारत रणनीतिक संबंध मजबूत करण्यासाठी तसेच एक प्रमुख संरक्षण भागीदाराच्या सुरक्षेला बळकट करण्यासाठी मदत करून अमेरिका आपली विदेश नीती व राष्ट्रीय सुरक्षेचे समर्थन करीत आहे.

डीएससीएने अमेरिकन काँग्रेसला एक प्रमुख विक्री अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, हिंद-प्रशांत व दक्षिण आशियायी क्षेत्रात राजनीतीक स्थिरता, शांतता व आर्थिक प्रगतीसाठी भारत एक महत्त्वपूर्ण शक्ती बनत आहे. भारताने मागणी केल्यानुसार त्यांच्या विमानांना लागणारे सुटे भाग, दुरूस्तीसाठीचे भाग, कारट्रिज एक्चुएटिड उपकरण किंवा प्रोपेलेंट एक्चुऐटिड उपकरण (सीएडी किंवा पीएडी), अग्निशमन कारट्रिज, आधुनिक रडार इशारा रिसीव्हर शिपसेट आणि जीपीएस यांचा यात समावेश आहे. यांची एकूण किंमत ९ कोटी डॉलर आहे.

पेंटागॉनने म्हटले आहे की, यापूर्वी खरेदी केलेल्या भारतीय हवाई दल, लष्कर व नौदलाच्या परिवहन गरजा, स्थानिक व आंतरराष्ट्रीय मानवीय साहाय्य व क्षेत्रीय आपत्ती मदतीसाठी प्रभावी पद्धतीने काम करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

ही सामग्री व सेवांची विक्री वायू सेनेला सी-१३० जे परिवहन विमानांच्या संदर्भात मिशनसाठी तयार ठेवण्यास मदत करणार आहे. भारताला यासाठी अतिरिक्त साहाय्य मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

.................

भारत अमेरिकेचा प्रमुख संरक्षण भागीदार

पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार, भारताला करण्यात येणाऱ्या प्रस्तावित विक्रीमुळे क्षेत्रातील मूलभूत सैन्य संतुलन बिघडणार नाही. अमेरिकेने २०१६ मध्ये एका मोठे पाऊल उचलत भारताला प्रमुख संरक्षण भागीदार घोषित केले होते, हे विशेष.

...........

पाकमध्ये हाफीज सईदच्या तीन साथीदारांना ५ वर्षांची जेल

टेरर फंडिंग : जागतिक दबाव वाढल्यानंतर कारवाई करण्यास गती

लाहोर : पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने जमात-उद-दावाच्या (जेयूडी) तीन म्होरक्यांना १५ वर्षांच्या जेलची शिक्षा सुनावली आहे. जमात-उद-दावा ही मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफीज याची संघटना आहे.

लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्या. एजाज अहमद बटार यांनी अब्दुल सलाम बिन मुहम्मद, जाफर इकबाल व मुहम्मद अशरफ याला ही शिक्षा सुनावली. हाफीज सईदचा मेहुणा प्रो. हाफीज अब्दुल रेहमान मक्की याला न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावलेली आहे.

न्यायालयातील सुनावणीच्या वेळी संशयितांना कडक सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आले होते. यावेळी माध्यमांना परवानगी देण्यात आली नव्हती.

न्यायालयाने कालच सईदचा प्रवक्ता याह्या मुजाहीद याला १५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यालाही टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन प्रकरणांत न्यायालयाने त्याला एकत्रित ३२ वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे.

जमात-उद-दावाचा म्होरक्या जाफर इकबाल याला टेरर फंडिंगच्या आरोपाखाली आता एकूण ४१ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या पोलिसांनी टेरर फंडिंगच्या आरोपावरून विविध शहरांमध्ये जमात-उद-दावाच्या नेत्यांवर ४१ गुन्हे नोंदविलेले आहेत. यापैकी २७ प्रकरणांत न्यायालयाने सुनावणी केली आहे.

दहशतवादविरोधी न्यायालयाने सईदला टेरर फंडिंग प्रकरणांमध्ये एकूण २१ वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे. ७० वर्षीय सईद जुलै २०१९ पासून लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात आहे. तेथे त्याला व्हीआयपी सुविधा मिळत आहेत, असे सांगण्यात येत आहे.

सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा ही लष्कर-ए-तैयबाची जुळी संघटना समजली जात असून, तिनेच मुंबईत २००८ सालचा भीषण हल्ला घडवून आणला. त्यात सहा अमेरिकनांसह १६६ जण ठार झाले होते. सईद हा अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेला अतिरेकी आहे व त्याच्यावर अमेरिकेने १० दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. त्याला मागील वर्षी १७ जुलै रोजी टेरर फंडिंग प्रकरणात गजाआड करण्यात आलेले आहे. २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही त्याला अतिरेकी म्हणून घोषित केलेले आहे.

......................

आर्थिक गर्तेतून बाहेर पडण्यासाठी कारवाई

सईद आणि मौलाना मसूद अजहर या भारताच्या मोस्ट वाँटेड अतिरेक्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानला फेब्रुवारी २०२१ पर्यंत एफएटीएफने ग्रे यादीत ठेवले आहे. त्यामुळे जगभरातून पाकवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढत आहे. त्या दबावातूनच पाकने हे पाऊल उचलले आहे.

मनी लाँड्रिंग व टेरर फंडिंग प्रकरणात पाकिस्तानने २०१९ च्या अखेरपर्यंत कारवाई करावी, असे एफएटीएफने म्हटले होते; परंतु कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे ही मुदत वाढविण्यात आली होती. पाकिस्तानला जून २०१८ पासून ग्रे यादीत ठेवण्यात आहे होते. ग्रे यादीत कायम राहिल्यास पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ), जागतिक बँक, आशियन विकास बँक व युरोपियन युनियनकडून मदत मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पाक आर्थिक गर्तेत जात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी या कारवाया करण्यात येत आहेत.

............

दुर्मिळ बाराशिंगी हरिण

भोपाळमध्ये मृतावस्थेत

भोपाळ : दुर्मिळ बाराशिंगी नर हरिण (स्वॅम्प डिअर) येथील वन विहार नॅशनल पार्कमध्ये शुक्रवारी मृतावस्थेत आढळले, असे अधिकाऱ्याने सांगितले. स्वॅम्प डिअर ही शिंगे असलेल्या हरणातील उपजात आहे. हे बाराशिंगी हरिण दुसऱ्या बाराशिंगी हरणासोबत झालेल्या भांडणात मरण पावले, असे दिसते, असे वन विहारचे उपसंचालक ए. के. जैन यांनी सांगितले.

बाराशिंगी हरणाच्या मृत्यूमुळे आता त्यांची संख्या १४ वर आली आहे. २०१५ मध्ये सात बाराशिंगी हरिण मांडलातील कान्हा टायगर रिझर्व्हमधून आणण्यात आले होते. वन विहारातील चांगले नैसर्गिक वातावरण व घेतल्या गेलेल्या काळजीमुळे या हरणांची संख्या चांगली वाढली. बाराशिंगी हरिण मध्यप्रदेश राज्याचा प्राणी आहे.

----------------------

घराला लागलेल्या

आगीत तिघांचा मृत्यू

जयपूर (राजस्थान) : घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत आई (३०) आणि तिची दोन मुले यांचा जळून मृत्यू झाला, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. ही दुर्घटना हनुमानगढ जिल्ह्यातील धोरेवाला भागात गुरुवारी रात्री घडली.

ऊर्मिला आणि तिची मुलगी रेखा (५) आणि मुलगा आयुष (३) हे झोपेत असताना आग लागली, तेव्हा ऊर्मिलाचा पती शेतात कामाला गेला होता.

घरातून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांना दिसताच दार तोडून तिघांनाही बेशुद्धावस्थेत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले.

-------------------

सहा जणांच्या हत्येतील वाँटेड

चकमकीत ठार, ५ पोलीस जखमी

-------------------------

रतलाम (मध्यप्रदेश) : सहा जणांच्या हत्येचा आरोप असलेला दिलीप देवाल (३५) याने पोलीस पथकावर केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात देवाल मरण पावला व पाच पोलीस जखमी झाले, असे पाेलिसांनी शुक्रवारी सांगितले.

गुरुवारी रात्री येथील मिड टाऊन कॉलनीत ही घटना घडली. देवाल याच्यावर ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले होते, असे उपपोलीस महानिरीक्षक सुशांत सक्सेना यांनी सांगितले.

देवाल हा मिड टाऊन भागात त्याच्या भाड्याच्या घरी पायी जात होता. त्या भागाला पोलिसांनी घेराव घालून त्याची कोंडी केली. या चकमकीत दोन सहायक उपनिरीक्षक आणि तीन कॉन्स्टेबल्स जखमी झाले, तर रुग्णालयात नेल्यावर देवालला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

देवाल याने गेल्या २५ नोव्हेंबर रोजी येथील राजीवनगरमध्ये एका जोडप्याला व त्यांच्या मुलीला लुटून त्यांची हत्या केली, असा पोलिसांचा आरोप आहे. देवाल याने गेल्या जून महिन्यात येथील कस्तुरबानगरमध्ये महिलेला लुटून तिची हत्या केली. तो गुजरातमधील दाहोत येथील दोन हत्यांसाठीही पोलिसांना हवा होता.

रतलाममध्ये देवालने शालेय शिक्षण घेतले. नंतर तो गुजरातला काही दिवसांसाठी गेला. तेथून तो २०१७ मध्ये परतला तो दोन जणांची हत्या करून, असे सक्सेना म्हणाले.

गेल्या आठ दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. सहायक उपनिरीक्षक अयूब खान आणि अनुराग यादव, तसेच तीन कॉन्स्टेबल्सनी त्याला ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यावर त्याने केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले. देवाल याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

--------------------

मल्ल्याची फ्रान्समधील १४ काेटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने फरार असलेल्या विजय मल्ल्याची फ्रान्समधील १.६ मिलियन युराे (१४ काेटी रुपये) किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. फ्रान्स सरकारने ईडीच्या विनंतीनंतर ही कारवाई केली आहे. किंगफिशर एअरलाईन्सच्या खात्यामध्ये माेठ्या प्रमाणावर बेहिशेबी रक्कम जमा करण्यात आली हाेती, असा खुलासाही ईडीने केला आहे. आतापर्यंत मल्ल्याची एकूण ११ हजार २३१ काेटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनच्या न्यायालयात भारताची कायदेशीर लढाई सुरू आहे. सुमारे ९ हजार काेटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी मल्ल्या वॉन्टेड आहे. ताे मार्च २०१६ पासून ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे. ब्रिटिश न्यायालयाने मे महिन्यात प्रत्यार्पणाला हिरवा कंदिल दिला हाेता; परंतु एका गाेपनीय खटल्याप्रकरणी प्रत्यार्पण हाेऊ शकलेले नाही.

-----------------

Web Title: Waqf Boards soon to be formed in Leh-Kargil, Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.