तरुणाईच्या भटकंतीमुळे मुले, ज्येष्ठांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:02 IST2021-04-13T04:02:01+5:302021-04-13T04:02:01+5:30
६ मार्चपासून शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. प्रारंभी जिल्हा प्रशासनाकडून संसर्ग थांबविण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या. त्याचा किंचितही ...

तरुणाईच्या भटकंतीमुळे मुले, ज्येष्ठांना कोरोनाची बाधा
६ मार्चपासून शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. प्रारंभी जिल्हा प्रशासनाकडून संसर्ग थांबविण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या. त्याचा किंचितही परिणाम दिसून आला नाही. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाल्याने राज्यशासनाने स्थगिती दिली. आता राज्य शासनाकडूनच व्यापक प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. शनिवार, रविवार वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यानंतरही असंख्य तरुण शहरात फिरत आहेत. विशेष बाब म्हणजे यातील काही तरुण मास्कचा वापरही करत नाहीत. पोलिसांनी दिवसा किंवा रात्री या तरुणांना पकडले तर वेगवेगळी कारणे सांगण्यात येतात. अनेकदा पोलीस मास्क न वापरल्याबद्दल आणि रात्री उशिरा संचारबंदीत फिरत असल्याने पाचशे रुपये दंड आकारत आहेत. त्यानंतरही शहरात तरुणाईच्या फिरण्यात फरक पडलेला नाही. रात्री उशिरा तरुण संसर्ग घेऊन घरात जात आहेत. घरातील लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक बाधित होत आहेत.
ही पहा उदाहरणे
सातारा भागात राहणारे एका कुटुंबातील लहान २ लहान मुले आणि एक ज्येष्ठ नागरिक कोरोना बाधित झाले. त्यांच्या संपर्कातील कुटुंबीयांची तपासणी केली असता त्यातील दोन तरुण पॉझिटिव्ह आले. विशेष बाब म्हणजे या तरुणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. दोन्ही तरुण काही दिवसांपासून संसर्ग घरात आणि बाहेर पसरवत होते. आपण घरात कोरोना संसर्ग पसरवत आहोत याची किंचितही जाणीव त्या तरुणांना नव्हती.
सिडको एन-४ भागातील एकाच कुटुंबातील सर्व सहा सदस्य कोरोना बाधित आढळून आले. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने याची अधिक माहिती घेतली असता घरातील एक तरुण सकाळ-दुपार-संध्याकाळ मित्रांकडे ये-जा करीत होता. घरातील इतर सदस्य बाहेर ये-जा करण्याचा प्रश्नच नव्हता. घरात तरुणाने संसर्ग आणला असावा असा निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने काढला.
बाहेरून आल्यानंतर उपाययोजना करायला हव्यात
शहरात काही दिवसांपासून कोरोनाचा नवीन स्ट्रेन धुमाकूळ घालत आहे. कमी वय असलेल्या तरुणांचा यामध्ये मृत्यू होत आहे. यानंतरही शहरातील तरुण ही अत्यंत बेफाम झाली आहे.
घरात आल्यानंतर सर्वप्रथम गरम पाण्याने हात पाय धुतले पाहिजेत. निर्जंतुकीकरण औषधांचा वापर केला पाहिजे. शक्य असेल तर अंघोळ करायला हवी. बाहेर घातलेले कपडे त्वरित गरम पाण्यात घातले पाहिजेत.
घरात जेष्ठ नागरिक असतील तर थेट त्यांच्या जवळ जायला नको, लहान मुले असतील तर त्यांना त्वरित जवळ घेऊ नये. प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्क वापरलाच पाहिजे.
१०६५
सोळा वर्षाखालील पॉझिटिव्ह
१९,७४९
पन्नास पेक्षा जास्त वय असलेले पॉझिटिव्ह
६७, ९३६
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
ज्येष्ठ लहान मुलांची इम्युनिटी कमी असते
ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळे आजार असतात. त्यांची इम्युनिटी खूप कमी असते. लहान मुलांची इम्युनिटी जास्त नसते. त्यामुळे घरातील मंडळींनी बाहेर वावरताना खूप काळजी घेतली पाहिजे. घरात गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या जवळ जाऊन बसू नये.
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा