वाळूमाफियांचा हैदोस
By Admin | Updated: April 1, 2015 01:04 IST2015-04-01T00:17:32+5:302015-04-01T01:04:32+5:30
वाळूज महानगर : वाळूमाफियांनी साऊथ सिटीत हैदोस घातला असून, ठिकठिकाणी खाजगी भूखंडावर मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आला आहेत.

वाळूमाफियांचा हैदोस
वाळूज महानगर : वाळूमाफियांनी साऊथ सिटीत हैदोस घातला असून, ठिकठिकाणी खाजगी भूखंडावर मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आला आहेत. या अवैध वाळूसाठ्याची रात्रीच्या वेळी चोरटी वाहतूक करून वाळूमाफिया उखळ पांढरे करून घेत आहेत. या वाळूसाठ्याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रात वाळूला चांगली मागणी असल्यामुळे अनेकांनी या व्यवसायात उडी घेतली आहे. गंगापूर तालुक्यातील शिवपूर, टेंभापुरी, तुर्काबाद, शेंदुरवादा तसेच पैठण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळूची ट्रक, टिप्पर या वाहनातून चोरटी वाहतूक करण्यात येते. शासनाचा महसूल बुडवून चोरट्यांना मार्गाने आणलेल्या या वाळूचे सिडको वाळूज महानगरातील साऊथ सिटीत खाजगी भूखंडावर ठिकठिकाणी वाळूमाफियांनी साठे करून ठेवले आहेत.
सध्या जिल्हाभरातील अनेक ठिकाणच्या वाळूसाठ्याचे लिलाव न झाल्यामुळे वाळूमाफिया चोरी-छुपे वाळू आणून वाळूज औद्योगिक परिसर तसेच शहरात विक्री करतात. मोठी कमाई होत असल्यामुळे वाळूमाफिया महसूल विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.
साऊथ सिटीत रात्रीच्या वेळी या भूखंडावर साठा करून वाळूची वाहनातून चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. तस्करीचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे.
महसूल विभागाचे दुर्लक्ष
वाळूमाफिया व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे लांगेबांधे असल्यामुळे वाळू तस्करीचा हा धंदा बिनबोभाट सुरू आहे. या नागरी वसाहतीत या अवैध धंद्यामुळे शांतता भंग पावत चालली असून महसूल व पोलीस अधिकारी कारवाई करण्याऐवजी गप्प बसत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.