भराडीच्या पुलाचे कठडे तुटले, अपघाताचा वाढला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:04 IST2021-07-29T04:04:26+5:302021-07-29T04:04:26+5:30
भराडी : शिऊर बंगला ते कन्नड या रस्त्याचे काम नुकतेच झाले असून या मार्गावरील भराडी व वांगी बुद्रुक येथील ...

भराडीच्या पुलाचे कठडे तुटले, अपघाताचा वाढला धोका
भराडी : शिऊर बंगला ते कन्नड या रस्त्याचे काम नुकतेच झाले असून या मार्गावरील भराडी व वांगी बुद्रुक येथील पुलांच्या कामाला संबंधित ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. दोन्ही पुलांची दुरवस्था झालेली असून कठडे तुटून पडलेले आहेत. परिणामी या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. दुसरीकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या पुलाच्या कामाकडे ठेकेदारावर मेहेरबानी करीत दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
कन्नड ते सिल्लोड रस्त्याचे काम गेल्या वर्षभरात पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने मार्गावरील अनेक पुलांची कामे पूर्ण केली. परंतु भराडी गावातील बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या पुलाच्या बांधकामाकडे ठेकेदारासह अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एव्हाना हा प्रकार देखील तितकाच सत्य आहे. भराडी येथील पूल सुमारे चाळीस वर्षांपूर्वी बांधला गेलेला आहे. पुलाचे बांधकाम दगड़ी असल्यामुळे पूल जीर्णावस्थेत गेलेला आहे. रस्त्याच्या बांधकामात हा पूलही कात टाकेल, असे नागरिकांना वाटत होते. परंतु तसे काहीच झाले नाही. नवीन बांधकाम तर जाऊ द्या हो, आहे त्या पुलाची दुरुस्ती देखील करण्यात आलेली नाही. परिणामी हा पूल धोकादायक बनला आहे. कठडे तुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाच्या खालील मोठ्या नाल्यात कोल्हापुरी बंधारा बांधला गेलेला आहे, त्यामुळे कायम पाणी साचलेले असते. दुर्दैवाने एखादा अपघात झाला, तर यात जीवित हानी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुलाचे कठडे बांधण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अशीच भयावह परिस्थिती वांगी बुद्रुक येथील पुलाची बनलेली आहे.
-----
अधिकारी म्हणतात... पाहणी करून निर्णय घेऊ
दोन्ही पुलांच्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे औरंगाबाद येथील शाखा अभियंता कोळसे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. नेमके काय करता येईल, याचा विचार करून संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या जातील. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी काळजी घेतली जाईल.
--
पुलाचे कठडे पूर्णपणे तुटलेले आहेत. किमान लोखंडी पाईपचे कठडे तरी बसविणे गरजेचे आहे. परंतु ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. जर येत्या काळात हे काम झाले नाही, तर भराडी येथील ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
- शिवराज खोमणे, भराडी.
---------
फोटो :
भराडी बसस्थानकाजवळील पुलाचे कठडे तुटलेले आहेत, त्यामुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे.
280721\20210728_121026-01_1.jpg
भराडी येथील पुलाचे कठडे तुटले आहेत ,त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.