पाऊले चालती खड्ड्यातूनी वाट
By Admin | Updated: June 25, 2014 01:03 IST2014-06-25T00:01:13+5:302014-06-25T01:03:39+5:30
पाटोदा : तालुक्यातून तीन प्रमुख पालख्यांसह ११ दिंड्या पंढरपूरकडे जातात. या पालखी मार्गाची दुरवस्था झाल्याने पाऊले चालते खड्ड्यातूनी वाट असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे.

पाऊले चालती खड्ड्यातूनी वाट
पाटोदा : तालुक्यातून तीन प्रमुख पालख्यांसह ११ दिंड्या पंढरपूरकडे जातात. या पालखी मार्गाची दुरवस्था झाल्याने पाऊले चालते खड्ड्यातूनी वाट असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे. वारकऱ्यांचे वर्षानुवर्षे हाल होत असले तरी रस्ते दुरूस्तीकडे मात्र कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे.
पाटोदा तालुक्यातून पैठण येथील संत एकनाथ महाराज यांची पालखी, आपेगाव येथून ज्ञानेश्वरांची पालखी, भगवानगड येथून भगवान बाबांची यासह विविध ११ पेक्षा अधिक दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. या पालख्या वर्षानुवर्षे जात असून दहा वर्षांपासून भगवानबाबांची पालखी सुरु करण्यात आलेली आहे.
पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्यभरातील पालखी मार्ग सुधारण्याचे काम हाती घेतले होते. या अंतर्गत सर्व रस्त्यांना पालखी मार्ग म्हणून दुरूस्त करण्यात आले. पालखी मार्ग प्रशस्त असावा, वारकऱ्यांना चालताना अडचणी येऊ नयेत, अपघात होऊ नये तसेच वाहतूकही सुरळीत व्हावी यासाठी पालखी मार्ग प्रशस्त करण्यात आले.
असे असले तरी पाटोदा तालुक्यातील पालखी मार्गांची मात्र कमालीची दुरवस्था झाली आहे. पाटोदा येथून जाणाऱ्या एक नाथांच्या व ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दोन मार्ग आहेत. यापैकी एकनाथांच्या पालखी मार्गाचा विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यानंतर या मार्गाचा विकास करताना मूळ रस्ताच गायब करण्यात आला. पूर्वापार परंपरेनुसार नाथांची पालखी, मुंगसवाडा (ता. पाथर्डी) , राक्षसभुवन (ता. शिरूर), रायमोहा, तांबा राजुरी, पारगाव, डिघोळ, मोहरी मार्गे खर्डा आणि पुढे मार्गक्रमण करत असे. नव्याने ही पालखी शिरूर, राक्षसभुवन, रायमोहा, गारमाथा, तांबा राजुरी, पाटोदा, पारगाव, डिघोळ, खर्डा असे मार्गक्रमण करते. सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखीचा मूळ मार्गच बदलल्याने भाविकातून नाराजी व्यक्त होत आहे.
पालखीसाठी शिरूर, राक्षसभुवन, किन्ही, चुंबळी हा रस्ता तयार झाला. या रस्त्याचीही आता बिकट अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडला आहे. तसेच खडेही वर आले आहेत. यामुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना ठेचा लागतात तर पायांना खडेही रूततात.
यामुळे भाविकांचे हाल होत असल्याने हा रस्ता डांबरीकरणाची मागणी भाविकातून होत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रस्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. तो ही मुळचा रस्ता बदलण्यात आला आहे. (वार्ताहर)
पालखी मार्गांकडे होतेय दुर्लक्ष
पालखी रस्त्याचा सर्व्हे पूर्वी झालेला आहे. याबाबत आपणास सांगता येणार नाही. सध्या असलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला आहे. तसेच पाटोदा ते अनपटवाडी दरम्यानच्या रस्त्याची दुरूस्ती केल्याचे उपअभियंता शेख जिलानी यांनी सांगितले.