पारडगावला एसटीची प्रतीक्षा
By Admin | Updated: June 21, 2014 00:55 IST2014-06-21T00:19:19+5:302014-06-21T00:55:02+5:30
पारडगाव : पारडगावात एसटी महामंडळाची बस येत नसल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. गावात लाल परी केव्हा येणार याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.
पारडगावला एसटीची प्रतीक्षा
पारडगाव : पारडगावात एसटी महामंडळाची बस येत नसल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. गावात लाल परी केव्हा येणार याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा करुनही बस सुरु झालेली नाही.
जालना तसेच अंबड आगाराची बस दहा वर्षे अगोदर मुक्कामी येत होती. घनसावंगी तालुका झाल्यापासून जिल्ह्याचे ठिकाणची बस तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या ग्रामस्थांना, व्यापाऱ्यांना व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. १० वर्षे अगोदर घनसावंगीतील बहुतेक रस्ते खड्डेमय व पाणंद रस्ते असूनही बससेवा सुरळीत होती. पूर्वीपेक्षा आता रस्त्याची परिस्थिती चांगली असतानाही बस ची सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे.
घनसावंगी येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या असुविधेचा सामना करावा लागत आहे. घनसावंगी या ठिकाणी सध्या मुला- मुलींची वसतिगृहे, डिजिटल गं्रथालय, मॉडेल कॉलेज, कृषी कार्यालय, सरकारी दवाखाना, तहसील कार्यालय, पंचायत समिती येथे ग्रामस्थांना खाजगी वाहन अथवा अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.
आजरोजी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा सुरू नसल्याने सर्वांची गैरसोय होत आहे. यामुळे या परिसरात खाजगी प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. तसेच अंतरवाला बु ते दर्गाशरीफ पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता होवून सहा वर्षे उलटून गेली तरी या रस्त्यावर अद्याप बस दिसलेली नाही.
विद्यार्थी चिंतेत
दोन दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला. या परिसरातील गोर गरीब विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण, औद्योगिक आयआयटी तसेच महाविद्यालयीन करण्यासाठी दैनंदिन बससेवा सुरू करण्यात यावी, अशी आशा विद्यार्थ्यांना आहे. (वार्ताहर)
ग्रामस्थ, विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष
या भागात आतापर्यंत ग्रामस्थांना एस.टी.चे दर्शन लोकसभा, विधानसभा च्या वेळेस मतदान पेट्यांसाठी एस.टी.गावात दिसली. परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांचे शिक्षण व ग्रामस्थांची अडचणी समजून लवकरात लवकर एस.टी.सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
पारडगावचे सरपंच चंद्रभूषण जैस्वाल, अंतरवाला बु. चे उपसरपंच भगवान टोम्पे, पांगराचे सरपंच गोपीचंद राठोड, पांगाराचे पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग राठोड, ढाकेफलचे सरपंच गाढवे, बोरगाव ताडचे उपसरपंच, पिरगैब तांडाचे सरपंच तसेच ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी बस सुरू करण्याची मागणी केलेली आहे.