नेट उत्तीर्ण ‘कोतवाली’साठी प्रतीक्षेत
By Admin | Updated: February 13, 2015 00:49 IST2015-02-13T00:41:55+5:302015-02-13T00:49:50+5:30
गोविंद इंगळे , निलंगा पदवी व पदव्युत्तर पदवी संपादन करूनही नोकरी नाही. एवढेच काय, प्राध्यापकाची राज्य आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षा पास होऊनही नोकरीची हुलकावणीच

नेट उत्तीर्ण ‘कोतवाली’साठी प्रतीक्षेत
गोविंद इंगळे , निलंगा
पदवी व पदव्युत्तर पदवी संपादन करूनही नोकरी नाही. एवढेच काय, प्राध्यापकाची राज्य आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षा पास होऊनही नोकरीची हुलकावणीच... घरात अठराविश्वे दारिद्र्य... वडिलांकडे असलेल्या कोतवालकीवरच उदरनिर्वाह, पण तेही आता सेवानिवृत्त... दहा जणांचे कुटुंब असलेल्या पोटाची खळगी भरायची कशी, असा प्रश्न पडलेला. त्यातच कोतवालकीची जाहिरात आली आणि निलंग्यातील माळेगाव (जे.) येथील धनराज अंबाटेने अर्ज केला. या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा धनराजला आहे.
निलंगा तालुक्यातील माळेगाव (जे.) येथील गोरोबा अंबाटे यांनी आपला मुलगा धनराजला शाळा शिकविली. तो बी.ए., एम.ए. झाला. बी.ए. झाल्यापासून नोकरीची शोधाशोध करतो. परंतु, सतत नोकरीची हुलकावणी. मराठी एम.ए. झाल्यावर त्याने सेट परीक्षा दिली. त्यात तो उत्तीर्णही झाला. नेट परीक्षाही तो उत्तीर्ण आहे.
प्राध्यापकांसाठी असलेल्या राज्य व राष्ट्रीय या दोन्हीही पात्रता परीक्षा तो उत्तीर्ण आहे. परंतु, नोकरीसाठी लागणारा पैसा त्याच्याकडे नाही. त्यामुळे त्याने आता कोतवालकीची परीक्षा दिली आहे. वडील गोरोबा अंबाटेही कोतवाल होते. ते आता सेवानिवृत्त आहेत. उत्पन्नाचे एकमेव साधन होते, तेही बंद आहे. जमीन नाही. त्यातच धनराजच्या मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू. त्याला तीन अपत्ये. आई-वडील व स्वत:ची पत्नी. एवढे मोठे कुटुंब. या घरप्रपंचाचा गाडा ओढायचा कसा? या विवंचनेत असलेल्या धनराजने कोतवाली पदासाठी अर्ज केला. परीक्षाही दिली आहे. किमान कोतवालाची तरी नोकरी लागेल, अशी आशा त्याला आहे. लेखी परीक्षा तो उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याची आशा आणखीनच पल्लवीत झाली आहे. प्राध्यापकाची नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, डोनेशन देण्याची ऐपत नसल्याने नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आता धनराज कोतवाल पदाकडे वळला आहे. या नोकरीकडे त्याचे डोळे लागले आहेत.
धनराजची पत्नी डीटीएड. आहे. परंतु, शासकीय शिक्षक भरती बंद असल्यामुळे आणि डोनेशन देण्याची ऐपत नसल्यामुळे त्याही घरीच असतात. दोन महिन्यांपूर्वी धनराजचे वडील गोरोबा अंबाटे कोतवाल पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे घरप्रपंच चालविण्यास कसरत करावी लागत आहे. आता कोतवाल पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल लागला. त्यात धनराज पास आहे. मुलाखत कधी होते आणि कोतवालकीची आॅर्डर कधी येईल, याकडे धनराजचेच नव्हे तर कुटुंबाचेही लक्ष लागले आहे.