घागरभर पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३७ गावांमध्ये ठणठणाट

By विजय सरवदे | Published: April 8, 2024 12:04 PM2024-04-08T12:04:00+5:302024-04-08T12:04:21+5:30

चिंता वाढली : वाढत्या उन्हाबरोबरच नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

Waiting for a tanker to fill a jug of water; Clashes in 337 villages of Chhatrapati Sambhajinagar district | घागरभर पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३७ गावांमध्ये ठणठणाट

घागरभर पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३७ गावांमध्ये ठणठणाट

छत्रपती संभाजीनगर : मागील पावसाळ्यात वरुणराजा रुसल्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट गडद होत चालले आहे. सद्यस्थितीत २८९ गावे आणि ४८ वाड्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत असून जिल्हा परिषदेच्या ४४३ टँकरद्वारे तेथील नागरिकांची तहान भागविली जात आहे. एप्रिल महिन्यात सुरुवातीचेच असे भीषण चित्र असेल, तर मे व जूनमध्ये काय स्थिती राहील, याचा यावरून अंदाज यावा.

पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पाण्याचे अनेक स्रोत आटले आहेत. परिणामी, ऑक्टोबरपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. नागरिकांना मोलमजुरी सोडून घागरभर पाण्यासाठी टँकरच्या प्रतीक्षेत दिवसभर बसावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २८९ गावे आणि ४८ वाड्या अशा एकूण ३३७ गावांसाठी ४४३ टँकरच्या दोन खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सध्या जिल्ह्यातील ९ पैकी खुलताबाद व सोयगाव या दोन तालुक्यांत पाणीटंचाई फारसा परिणाम जाणवत नाही. सध्या तरी या दोन्ही तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. मात्र, उर्वरित सातही तालुक्यांतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामध्ये गंगापूर तालुक्यातील सर्वाधिक गावे, तर सर्वाधिक कमी कन्नड तालुक्यातील गावे तहानलेली आहेत. गंगापूर तालुक्यातील ७० गावे, पैठण तालुका- ६२, छत्रपती संभाजीनगर तालुका- ५९, वैजापूर तालुका- ५७, फुलंब्री-४०, सिल्लोड- ३७ आणि कन्नड तालुक्यातील १२ गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

उन्हाबरोबर पाणीटंचाई वाढली
वाढत्या उन्हाबरोबर आता पाणीटंचाईही वाढत आहे. भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालवत गेल्यामुळे नद्यांसह ओढे- नाले, मध्यम, लघु प्रकल्प, विहिरी, हापसे कोरडी पडली आहेत. काही ठिकाणी विहिरींना थोडे पाणी आहे, अशा टंचाईग्रस्त गावांतील २२६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याच अधिग्रहीत विहिरींचे पाणी टँकरद्वारे ३३७ गावांना पुरविले जात आहे.

अडीच महिने कसे काढणार?
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच नागरिकांना पाणीटंचाईच्या भीषण वास्तवाला सामोरे जावे लागत असेल, तर पुढील अडीच महिने कसे काढावेत, अशी चिंता ग्रामस्थांना सतावत आहे. माणसांनाच पिण्याच्या पाण्याचे वांधे असेल, तर जनावरांचे काय हाल होतील. शासनाने जनावरांसाठीही पाण्याची व्यवस्था करावी, या मागणीने आता जोर धरला आहे.

Web Title: Waiting for a tanker to fill a jug of water; Clashes in 337 villages of Chhatrapati Sambhajinagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.