पंधराशे शेतकऱ्यांना कृषीपंपांची प्रतीक्षा
By Admin | Updated: June 10, 2014 00:15 IST2014-06-10T00:00:19+5:302014-06-10T00:15:23+5:30
विठ्ठल भिसे, पाथरी कृषीपंपासाठी वीजपुरवठा करण्यासाठी कोटेशन भरूनही विद्युत साहित्य आणि वीज कनेक्शन न मिळाल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत़

पंधराशे शेतकऱ्यांना कृषीपंपांची प्रतीक्षा
विठ्ठल भिसे, पाथरी
कृषीपंपासाठी वीजपुरवठा करण्यासाठी कोटेशन भरूनही विद्युत साहित्य आणि वीज कनेक्शन न मिळाल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत़ २०११ पासून जवळपास पंधराशे शेतकरी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत़ तर दोन महिन्यांपासून वीज कनेक्शनसाठी साहित्याचा पुरवठा करणारा ठेकेदार नसल्याने या काळामध्ये नवीन वीज कनेक्शन देण्यात आले नाही़
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडून काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज कनेक्शनचा पुरवठा करणे आणि साहित्याचा पुरवठा करण्यासाठी ठेकेदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या़ चार वर्षांत ठेकेदारांकडून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी साहित्याचा पुरवठा न केल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे़ मे २०१४ अखेर तालुक्यामध्ये पंधराशे शेतकरी वीज कोटेशन भरूनही विद्युत जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत़ जानेवारी २०११ मध्ये तालुक्यातील १ हजार १०० शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी कोटेशन भरले़ त्यानंतरही कृषीपंपाचे कोटेशन भरणेच चालू होते़
आतापर्यंत २०१० कोटेशन भरणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीपंपांचा साहित्य पुरवठा करण्यात आला़ त्यानंतर मात्र कोटेशन भरणारे शेतकरी अद्यापही कृषी पंपाच्या कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत़ पाथरी तालुक्यातील कृषी पंपासाठी साहित्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांची मुदत दोन महिन्यांपूर्वी संपली़ नवीन ठेकेदार अद्याप नियुक्त करण्यात आला नाही़ यामुळे मागील दोन महिन्यांत शेतकऱ्यांना कृषीपंपाचे कनेक्शन जोडण्यात आले नाहीत़ सध्या खरीप हंगामाच्या तोंडावर पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन नसल्याने सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करता येत नाहीत़ अनेक शेतकरी या बाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे चकरा मारून विचारणा करीत आहेत़ परंतु, शेतकऱ्यांच्या हाती निराशाच पडत आहे़ ठेकेदार पद्धतीमुळे शेतकऱ्यांना वेळेच्या आत वीज कनेक्शन मिळेल, अशी अपेक्षा असतानाही ठेकेदार पद्धती शेतकऱ्यांना गैरसोयीची ठरू लागली आहे़
शासनाकडून दुर्लक्ष
एकीकडे शासन प्रत्येक शेतकऱ्याला वेळेच्या आत वीजपुरवठा झाला पाहिजे, यासाठी आग्रही भूमिका घेत असतानाही तालुक्यातील मागील साडेतीन वर्षांपासून शेतकरी कृषीपंपांच्या कनेक्शनसाठी झगडत आहेत़ यासाठी शासन जवाबदार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़
कृषीपंपांना वीजजोडणी तातडीने करावी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी रेणापूर येथील ज्येष्ठ शेतकरी गंगाधरराव गायकवाड यांनी केली आहे़
ठेकेदारांकडून साहित्य पुरवठा नाही
प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी साहित्याचा पुरवठा करताना ठेकेदार चालढकल करतात़ वास्तविक पाहता वीज मंडळाच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन वीज पोल उभे करून विजेचे कनेक्शन ओढून देण्यापर्यंत ठेकेदारांची जिम्मेदार असताना देखील ठेकेदार शेतकऱ्यांना गोदामातून साहित्य नेण्यास सांगतात आणि त्यांच्याकडूनच वीज पोल उभारणीच्या कामापासून तार ओढण्याचे कामही करून घेतात़ त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे़