लोकशाही सुदृढ, सक्षम बनविण्यासाठी मतदान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 22:25 IST2019-03-31T22:25:21+5:302019-03-31T22:25:37+5:30
लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केले.

लोकशाही सुदृढ, सक्षम बनविण्यासाठी मतदान करा
औरंगाबाद : लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केले.
विद्यापीठ परिसरातील आंबेडकर महाविद्यालयात आयोजित ‘रन फॉर डेमोक्रसी’ मतदान जागरूकता मॅरेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये सुमारे ५०० जणांनी सहभाग नोंदविला.
सुरुवातीला मतदानाच्या प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्र सिंघल आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, निवडणूक नायब तहसीलदार मिलिंद धनंजकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, मतदान प्रक्रियेप्रती आजचे युवक जागरूक व्हावेत. तसेच त्यांनी राष्ट्राच्या विकासाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी. यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. मतदान करणेसुद्धा देशसेवेचाच एक भाग असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.