पुण्यकर्मच शेवटपर्यंत आपल्या सोबत राहील

By Admin | Updated: July 31, 2014 01:26 IST2014-07-31T01:02:47+5:302014-07-31T01:26:35+5:30

औरंगाबाद : प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये सत्कर्मांना, धर्माच्या कामाला, पुण्य संचयाला आपल्या कार्यात शेवटचा क्रमांक देतात.

Virtue will remain with you till the end | पुण्यकर्मच शेवटपर्यंत आपल्या सोबत राहील

पुण्यकर्मच शेवटपर्यंत आपल्या सोबत राहील

औरंगाबाद : प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये सत्कर्मांना, धर्माच्या कामाला, पुण्य संचयाला आपल्या कार्यात शेवटचा क्रमांक देतात. वास्तविक सक्षम आहात तोवरच तुमच्या हातून पुण्यकर्म, सत्कर्म होतील. ही सत्कर्मेही तुम्ही तुमच्या कल्याणासाठीच करता; परंतु तुमच्या मनात आपण कुणावर तरी उपकार करीत असल्याची भावना असते. क्षमता आहे तोवर पुण्यसंचय करा, चांगली कर्मे करा. आज आपल्याकडील सत्ता, सौंदर्य, पैसा, ऐश्वर्य हे सारे आपली कमाई नाही. त्यात अनेकांच्या पुण्याचा वाटा आहे. आपण केलेल्या पुण्यकर्माचे धनच शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहील हे लक्षात ठेवा.
आम्ही सुखात असतो तेव्हा आम्हाला देव आठवत नाही, आम्हाला चांगली कामे करण्यास फुरसत नसते आणि आम्ही दु:खात, कष्टात असल्यावर आमच्याकडून काही होत नाही. ही परिस्थिती योग्य नाही. दु:खात असताना भलेही धर्म करू नका; पण सुखात असताना उन्मादामध्ये आमच्या हातून पाप तरी होणार नाही याची काळजी घ्या. सक्षम असताना तुमच्याकडे सगळीच अनुकूलता असते. डोळे चांगले आहेत तर चांगले बघा, चांगले शरीर आहे तर सत्कर्म करा, चांगला मेंदू आहे तर सत्कर्माचा विचार करा. सुखाचा सदुपयोग करा म्हणजे दु:ख येईल तेव्हा आपली समाधी अवस्था कायम राहू शकेल.
अक्षम होता, वृद्ध होता तेव्हा आपली कर्मे आपल्यासमोर उभी राहतात. आपण जोपर्यंत या जमिनीशी जोडलेलो असतो, तोपर्यंतच कोणताही ऋतू असला तरी त्यावर पाने, फळे येण्याची शक्यता असते, त्यामुळे जमीन कधी सोडू नका, एकदा का तुमची जमीन सुटली की, तुमचा जीवनवृक्ष सुकायला वेळ लागणार आहे. सत्कर्माची, धर्माची, चांगल्या कर्माची भूमी कधीही सोडू नका. त्यात कमी-जास्त होईल; परंतु ते कायम ठेवा.

Web Title: Virtue will remain with you till the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.