जिल्हा प्रशासनाच्या उत्साहावर विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:04 IST2021-04-10T04:04:41+5:302021-04-10T04:04:41+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने उद्या, रविवारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित केली होती. ...

जिल्हा प्रशासनाच्या उत्साहावर विरजण
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने उद्या, रविवारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी शुक्रवारी परीक्षा स्थगित झाल्याचा निरोप आला आणि प्रशासनाच्या उत्साहावर विरजण पडले. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा तूर्त स्थगित करण्यात आल्याचा निरोप जिल्हा प्रशासनाला सायंकाळी सहा वाजता मिळाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी जिल्हा प्रशासनाला ई-मेल संदेशाद्वारे कळविले की, ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, या परीक्षेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली संवेदनशील, गोपनीय सामग्री, कोविड किट, हजेरीपट, स्टिकर्स व इतर लेखनसामग्री या परीक्षेची सुधारित तारीख जाहीर होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कस्टडीत सुरक्षित ठेवण्यात यावी.
तत्पूर्वी, दोन दिवसांवर आलेल्या या परीक्षेची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी करीत होते. या परीक्षेसाठी लागणारे मनुष्यबळ, परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना मास्क, हातमोजे, सॅनिटायझरचे पाऊच, ऑक्सीमीटर, तापमान मोजण्याचे यंत्र तसेच हे साहित्य केंद्रनिहाय पोहोच करण्यासाठी वाहनांचे नियोजन केले जात होते.
परीक्षेसाठी औरंगाबादेत १९ हजार ६६३ उमेदवारांनी नोंदणी केली असून, ६० केंद्रांवर या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी १६५० कर्मचारी तैनात करण्यात आले असून, त्यांना त्यासंबंधितांना त्याबाबतचे पत्रही पाठविण्यात आले आहे. एका कक्षात २४ विद्यार्थी याप्रमाणे १२०० कक्षांमध्ये ही परीक्षा घेण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली होती. मात्र राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असून, परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे आरोग्य तसेच सरकारी यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत उद्या, रविवारची ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला.