कडेठाणचे गावकरी महालक्ष्मीच्या मंदिरात मुक्कामी; होमहवन झाल्यानंतरच जाणार आपल्या घरी
By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 20, 2023 15:38 IST2023-10-20T15:37:30+5:302023-10-20T15:38:08+5:30
भाविक एकदा मुक्कामाला आले की, नऊ दिवस मंदिराबाहेर पडत नाहीत.

कडेठाणचे गावकरी महालक्ष्मीच्या मंदिरात मुक्कामी; होमहवन झाल्यानंतरच जाणार आपल्या घरी
छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवातील आठ दिवस गावकरी महालक्ष्मी देवीच्या मंदिरातच मुक्काम करतात. पहिल्या माळेला येतात व अष्टमीच्या दिवशी होमहवन झाल्यावर आपल्या घरी जातात. तोपर्यंत घरचे तोंडही पाहत नाही. होय ही प्रथा आहे पैठण तालुक्यातील ‘कडेठाण’ या तीर्थक्षेत्रातील. हे वाचून आपणास आश्चर्य वाटले असेल, पण भाविक एकदा मुक्कामाला आले की, नऊ दिवस मंदिराबाहेर पडत नाहीत.
कोल्हापूरच्या देवीचे उपपीठ
ज्या भाविकांची कुलदेवता कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, पण त्यांना काही कारणांस्तव कोल्हापूरला जाता आले नाही, किंवा जाता येत नसेल तर त्यांनी पैठण तालुक्यातील कडेठाण या गावात यावे, येथे महालक्ष्मीचे उपपीठ आहे. येथे देवीचे दर्शन घेतले म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यासारखेच मानले जाते.
गावकरी मंदिरात का मुक्काम करतात?
कडेठाणच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवात गावकऱ्यांनी मुक्काम करण्याची पिढ्यान्पिढ्या चालत आलेली परंपरा आहे. मुक्कामी आलेले गावकरी नवरात्रोत्सवात देवीची आराधना, सेवा करतात. ही परंपरा आजतागाजत गावकरी पाळत आले आहेत.
नऊ दिवस मंदिरात काय करतात भाविक?
नवरात्रीच्या पहिल्या माळेला घटस्थापना झाली की, भाविक महालक्ष्मीच्या मंदिरात मुक्कामी येतात. पाचव्या माळेपासून मुक्कामी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढते. मंदिरात सकाळची पूजा, आरती, संध्याकाळी आरती, तसेच भारुड, पोथी, दुपारी भजन, प्रवचन, रात्री कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांत भाविक सहभागी होतात. याशिवाय मंदिरात ‘सेवा’ही देतात. या काळात भाविक मंदिराबाहेर पडत नाहीत.
मंदिरात सोयीसुविधा वाढविल्या
मंदिराच्या चहूबाजूने मुक्कामी आलेल्या भाविकांची राहण्याची, झोपण्याची व्यवस्था केली जाते. येथेच स्नानाची व्यवस्था, चहा-नास्ता, जेवणाची सोय करण्यात आली आहे. १८ वर्षांच्या मुलापासून ते ८० व त्यापुढील वयाचे भाविक येथे मुक्कामी येतात.
महिलासुद्धा मोठ्या संख्येने मुक्कामी असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था केली आहे.
प्रत्येक घरातील एक व्यक्ती मंदिरात
नवरात्रोत्सवात कठेठाण व आसपासच्या पंचक्रोशीतील प्रत्येक घरातून एक व्यक्ती महालक्ष्मीच्या मंदिरात नवरात्रोत्सवात मुक्कामी येत असतो.
आजोबा, वडील.. आता मी
महालक्ष्मी आमची कुलदेवी आहे. नवरात्रोत्सवात देवीची भक्ती करण्यासाठी आम्ही मंदिरात मुक्कामी येतो. माझे आजोबा त्यानंतर वडील येथे मुक्कामी येत त्यानंतर आता मी ही परंपरा कायम ठेवली आहे. यानिमित्ताने सर्व मित्र एकत्र येतात. नऊ दिवस वैराग्यासारखे सर्वजण जीवन जगतात, अशी माहिती मुक्कामी आलेले जेष्ठ नागरिक शिवाजी तवार, कालिदास तवार यांनी दिली.