ईट औटपोस्टवर ग्रामस्थ, व्यापाऱ्यांचा मूकमोर्चा
By Admin | Updated: November 16, 2015 00:37 IST2015-11-15T23:53:01+5:302015-11-16T00:37:14+5:30
ईट : गेल्या वर्र्षभरामध्ये ईट गावामध्ये घरफोड्या, दुकानफोड्या तसेच दुचाकीचोरीच्या २० ते २२ घटना घडल्या. परंतु, पोलिसांना अद्याप एकाही घटनेचा तपास लागलेला नाही.

ईट औटपोस्टवर ग्रामस्थ, व्यापाऱ्यांचा मूकमोर्चा
ईट : गेल्या वर्र्षभरामध्ये ईट गावामध्ये घरफोड्या, दुकानफोड्या तसेच दुचाकीचोरीच्या २० ते २२ घटना घडल्या. परंतु, पोलिसांना अद्याप एकाही घटनेचा तपास लागलेला नाही. याच्या निषेधार्थ १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत नागरिकांनी येथील व्यापार पेठ बंद ठेऊन औटपोस्टवर मूकमोर्चा काढला.
ईट हे गाव उस्मानाबाद, बीड, अहमदनगर या तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे. जवळपास पंधरा-सतरा खेड्यासाठी ईट ही मोठी व्यापारपेठ आहे. येथे वाशी पोलीस ठाणेअंतर्गत औट पोस्ट असून, त्यात तीन पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरात पेट्रोलपंपाची चोरी, दोन सराफी दुकानांच्या चोऱ्या, कापड दुकान, किराणा दुकानाची चोरी यासह १० ते १२ घरफोड्या, चार दुचाकीच्या चोऱ्या तसेच शेतकऱ्याच्या बैलजोड्या चोरीच्याही दोन घटना घडल्या. घटना घडताच पोलीस प्रशासनामार्फत गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली; परंतु आजवर एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
गेल्या सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये तर चोरट्यांनी कहरच केला आहे. या कालावधीत अशा तब्बल नऊ घटना घडल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांतही चोरट्यांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. असे असताना पोलिस प्रशासनाकडून मात्र ही बाब गांभिर्याने घेण्यात आली नाही. त्यामुळे १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेऊन व्यापारी, पदाधिकारी व ग्रामस्थांनी बसस्थानक चौकातून औटपोस्टवर मूक मोर्चा काढला. या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यास निवेदन देण्यात आले. या मूकमोर्चामध्ये कॉग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब देशमुख, दासराव हुंबे, प्रताप देशमुख, दत्तात्रऊ आसलकर, राजाभाऊ हुंबे, दत्ता अहिरे, भाजपाचे राजसिंह पांडे, माजी सरपंच युवराज देशमुख सह प्रतिष्ठीत व्यापारी आनंद बापु देशमुख, अशोक लिमकर, मनोज वाघवकर, गणेश दीक्षित यांच्यासह व्यापारी, ग्रामस्थ शेकडोच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी पोहेकॉ. रामदास भालेराव व एस. ए. ढाकणे यांनी चोख बंदोबस्त करण्याची ग्वाही दिली. (वार्ताहर)