छत्रपती संभाजीनगर : मध्यरात्री अमली पदार्थांच्या नशेत वाहनांची तोडफोड, कर्कश आवाजात आरडाओरड करणाऱ्या गावगुंडांनी मुकुंदवाडी, रामनगर, प्रकाशनगरमध्ये दहशत माजवली आहे. दिवसा शाळांसमोर उभे राहून मुलींंकडे पाहत अश्लील चाळे करून सामान्यांना चाकू लावून लुटले जात आहे. १२ ते १४ जुलै दरम्यान अशा तीन घटना घडलेल्या असताना पोलिसांनी मात्र या तक्रारी केवळ ‘अदखलपात्र’ गुन्ह्यावर निकाली काढल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
रविवारी मध्यरात्री २:३० वाजता विठ्ठलनगर, प्रकाशनगर परिसरात नशेत असलेल्या टवाळखोरांनी मुख्य रस्त्यांवर आरडाओरड करत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. तान्हाजी नगरमध्ये जात विक्रमादित्य शाळेसमोर अर्ध्या तासाच्या अंतराने त्यांनी वाहनांवर लाठ्या, काठ्या, दगड टाकून पाच ते सात वाहनांची तोडफोड केली. या आवाजामुळे स्थानिक घाबरून गेले होते. नागरिकांनी एकत्र येत त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पळ काढला. सोमवारी सायंकाळी नागरिकांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सायंकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याच नशेखोर टवाळखोरांनी शनिवारी रात्री प्रकाशनगरमध्ये वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फोडून, वाहनांमधील साऊंड सिस्टीम चोरण्याचा प्रयत्न करून आतील भागाचे नुकसान केले.
रात्री तोडफोड, दिवसा लूटमारअनेक दिवसांपासून नशेखोर टोळ्या परिसरात दहशत माजवत आहेत. सोमवारी सकाळी एकाने एका भाजी विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. या टोळ्या चौकात वारंवार उभ्या राहतात. रात्री रस्त्यावरच दारू, गांजाचे सेवन करून मोबाईल मागून पळून जाणे, भाजी विक्रेत्यांशी हुज्जत घालणे, पैसे मागून वाहनांमधील साहित्य चोरण्याचे प्रकार करत असल्याची लेखी तक्रार स्थानिकांनी पोलिसांकडे केली. काही दिवसांपूर्वीच रामनगर रस्त्यावर दोन तरुणांवर चाकूहल्ला झाला होता.
शाळेसमोर उभे राहून छेडछाडप्रकाशनगर, रामनगर, विठ्ठलनगरमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा, क्लासेस आहेत. या टवाळखोरांकडून दिवसा तेथे उभे राहून मुलींना पाहून अश्लील शेरेबाजी, गाणी गाण्याचे कृत्य केले जाते. पोलिस त्यांच्यावर कठोर पाऊल उचलत नसल्याने अशांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. शनिवार व सोमवारच्या घटनांमध्ये पोलिसांनी केवळ ‘अदखलपात्र’ गुन्हे दाखल करून नागरिकांना परतवून लावले.