विलासरावांनी सर्वसमावेशक राजकारण केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:05 IST2021-05-28T04:05:17+5:302021-05-28T04:05:17+5:30
औरंगाबाद : एखादा नेता ‘क्लासेस टू मासेस’ कसा असतो आणि जातीधर्माच्या पलीकडे सर्वसमावेशक राजकारण करू शकतो, याचे उत्तम उदाहरण ...

विलासरावांनी सर्वसमावेशक राजकारण केले
औरंगाबाद : एखादा नेता ‘क्लासेस टू मासेस’ कसा असतो आणि जातीधर्माच्या पलीकडे सर्वसमावेशक राजकारण करू शकतो, याचे उत्तम उदाहरण विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील त्यांच्या नावे असलेल्या अध्यासन केंद्राच्यावतीने बुधवारी डॉ. सुधीर गव्हाणे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले होते. ‘विलासराव देशमुख : एक दृष्टे नेते’ या विषयावर डॉ. गव्हाणे म्हणाले की, गावचा सरपंच ते थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत अशी देदीप्यमान वाटचाल करणारे विलासराव दृष्टे नेते होते. महाराष्ट्राने उच्च गुणवत्तेचे नेतृत्व देशाला दिले आहे. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण या नेत्यांचा समर्थ वारसा विलासराव यांनी पुढे नेला. घरात कोणती पार्श्वभूमी नसताना त्यांचा राजकीय प्रवास कौतुकास्पद आहे. ग्रामीण भारतातील वास्तविक सत्यता आणि शेतकरी तसेच गरीब लोकांच्या समस्या सोडवण्याची क्षमता जाणणारे ते नेते होते.
चौकट............
विलासराव देशमुख स्टुडिओचे लोकार्पण
विद्यापीठात विलासराव देशमुख यांच्या नावाने अद्ययावत डिजिटल स्टुडिओ उभारण्यात आला असून, त्याचे लवकरच समारंभपूर्वक लोकार्पण करण्यात येईल, अशी घोषणा अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केली, तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यासनातर्फे लवकरच विलासरावांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा ग्रंथ व त्यांच्या भाषणाचे पुस्तक प्रकाशित केले जाणार असल्याचे डॉ. राम चव्हाण यांनी सांगितले. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. हणमंत सोनकांबळे यांनी आभार मानले.