पाच ग्रामपंचायतीत विहीर कामात घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 00:51 IST2016-03-29T00:21:08+5:302016-03-29T00:51:46+5:30
बीड : प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ नसताना वैयक्तिक लाभाच्या तसेच सार्वजनिक विहिरी खोदून बोगस हजेरीपत्रकाधारे बिले काढून लाखोंचा घोटाळा झाल्याचे सोमवारी उघड झाले.

पाच ग्रामपंचायतीत विहीर कामात घोटाळा
बीड : प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ नसताना वैयक्तिक लाभाच्या तसेच सार्वजनिक विहिरी खोदून बोगस हजेरीपत्रकाधारे बिले काढून लाखोंचा घोटाळा झाल्याचे सोमवारी उघड झाले. याप्रकरणी जि. प. सीईओंनी अज्ञात आरोपीविरूध्द फौजदारी कारवाईचे आदेश दिले.
पाचही ग्रामपंचायती बीड तालुक्यातील असून, गटविकास अधिकाऱ्यांना कानोकान खबर लागू न देता हा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. साखरे बोरगावात सार्वजनिक विहीर व पाच वैयक्तिक विहिरी, वाणगावात तीन वैयक्तिक विहिरी, खंडाळ्यात एक सार्वजनिक विहीर, कोल्हारवाडी व तळेवाडीत प्रत्येकी दोन वैयक्तिक विहिरी खोदून बोगस मजुरीपत्रक दाखवून मजुरी उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याने एक गोपनीय पत्र लिहून गटविकास अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यानंतर गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे यांनी चौकशी केली तेव्हा हा घोटाळा झाल्याचे उघड झाले. त्यांनी याचा अहवाल जि. प. च्या म. ग्रा. रो. ह. यो. चे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांना पाठविला.
पासवर्ड फुटला कसा ?
मस्टर ट्रॅकर सिस्टिीममध्ये गोपनीय पासवर्ड असतो. या पासवर्डशिवाय आॅनलाईन मजूर नोंदी, बिले काढता येत नाहीत. असे असतानाही पाच ग्रामपंचायतींमध्ये अपहार झाल्याचे समोर आले. त्यामुळे संशयाची सुई कर्मचाऱ्यांभोवतीच फिरू लागले आहेत. (वार्ताहर)