मृत्यूबरोबर शासकीय उदासीनतेचेही बळी!
By Admin | Updated: May 30, 2014 01:03 IST2014-05-30T00:53:58+5:302014-05-30T01:03:21+5:30
बापू सोळुंके, औरंगाबाद बंगला तांडा हा सुमारे दीड हजार लोकवस्तीचा. गुरुवारची दुपारची वेळ. आठ दिवसांत गावातील तीन महिलांचा बळी गेल्याच्या घटनेमुळे तांड्यावर तशी सामसूमच

मृत्यूबरोबर शासकीय उदासीनतेचेही बळी!
बापू सोळुंके, औरंगाबाद बंगला तांडा हा सुमारे दीड हजार लोकवस्तीचा. गुरुवारची दुपारची वेळ. आठ दिवसांत गावातील तीन महिलांचा बळी गेल्याच्या घटनेमुळे तांड्यावर तशी सामसूमच. ज्या कुटुंबातील महिलांचा बळी गेला त्यांच्या घराच्या परिसरात स्मशानशांतता. कुटुंबातील माणसेही चिंताक्रांत. का घडले असे, कशामुळे घडले, याचीच गावात चर्चा चालू असल्याचे दिसून आले. तीन महिलांचा मृत्यू होऊन कोणताही शासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी किमान सहानुभूती दर्शविण्यासाठी का होईना तांड्यावर फिरकले नाही, याबाबतही संताप व्यक्त केला जात आहे. कशी घडली घटना बिडकीन येथील शेतकरी भीमाजी भालेकर आणि राजू भीमाजी भालेकर यांच्या शेतात पालेभाज्यांचे पीक आहे. २३ मे रोजी त्यांनी शेतातील कांद्याचे पीक काढण्यासाठी बंगला तांडा येथून सात महिला मजुरांना शेतात नेले. कडक उन्हाळ्यामुळे प्रत्येक मजूर महिलेने सोबत पिण्यासाठी कळशीत पाणीही नेले होते. शेतात गेल्यानंतर त्यांना तेथे एक जुना माठ दिसला. हा माठ त्यांनी धुतला आणि सोबत नेलेले पाणी त्यांनी त्या माठात थंड होण्यासाठी ठेवले. दुपारी २ वाजेच्या सुमारास जेवणाची सुटी झाली. त्यावेळी सर्व महिलांनी जेवण केले. यावेळी पार्वतीबाई दुधा राठोड (६५), कमळाबाई दौलत आडे (६०) आणि कौराबाई देवीदास राठोड, कलाबाई शेषराव राठोड आणि सोनू अनिल राठोड (२२) यांनी त्या माठातील पाणी प्राशन केले. त्यानंतर अर्धा ते पाऊण तासानंतर या चार जणींना उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला. काही वेळातच पार्वतीबाई बेशुद्ध पडली. भालेकर यांनी तातडीने रिक्षातून सर्वांना बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथेही वरिष्ठ डॉक्टर नसल्याने तासाभरानंतर सर्वांना घाटीत पाठविण्यात आले. घाटीत जाण्यापूर्वीच पार्वतीबाई यांचा मृत्यू झाला. कमळाबाई आडे आणि कौराबाई राठोड यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सोनूबाई आणि कलाबाई खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. मृत पार्वतीबाई राठोड यांच्या घरी त्यांचे वृद्ध पती दुधा राठोड यांच्याजवळ नातेवाईक बसलेले होते. ते रडत होते. त्यांची दोन्ही मुले विभक्त आहेत. मोलमजुरी करून पत्नीच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आणि सुश्रूषा करायची. पार्वतीबार्इंच्या निधनाने ते हतबल झाल्याचे दिसत होते. मृत कौराबाई देवीदास राठोड यांच्या घरासमोर नातेवाईक महिला आणि त्यांची मुले बसलेली होती. कौराबाई यांना शेती नाही. त्यांना अविवाहित दोन मुले आणि विवाहित पाच मुली आहेत. विषबाधेच्या घटनेपासून त्यांच्या घरात चूल पेटलेली नाही. बुधवारी त्यांचे निधन झाल्यावर एका मुलाची प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. कौराबाई आणि कलाबाई शेषराव राठोड या सख्ख्या जावा आहेत. त्यांच्या उपचारांसाठी सुमारे ३ लाख रुपये खर्च झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मृत कमळाबाई यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांना तीन मुली आणि मुलगा आहे. त्यांचे लग्न झालेले आहे. मुलगा, पती आणि कमळाबाई या मजुरी करतात. त्यांच्या निधनामुळे हे कुटुंबच संकटात सापडले आहे. ही दुर्घटना घडल्यापासून गावात स्मशानशांतता आहे. स्मशानशांततेत अश्रंूना वाट या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाल्याने लोकमत प्रतिनिधींनी गुरुवारी बंगला तांड्याला भेट दिली. त्यावेळी गावातील स्मशानशांतता स्पष्टपणे जाणवत होती. यावेळी लोकमतच्या प्रतिनिधींनी मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला तेव्हा त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. आमच्या मातांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शेतकर्यास शासन झालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय पुढार्यांची बंगला तांड्याकडे पाठ निवडणूक आली की, मतदारांचे उंबरठे झिजविणार्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पुढार्यांनी मात्र बंगला तांडा येथे घडलेल्या विषबाधेच्या घटनेकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुढार्यांविषयी गावकर्यांमध्ये प्रचंड संताप असल्याचे दिसले. एवढेच नाही तर आठ दिवसांत तीन महिला विषबाधेने मरण पावल्या असताना तलाठी किंवा तहसीलदार गावात आला नाही. यावरून सरकारी पातळीवरही या घटनेबद्दल अनास्था असल्याचे दिसते. ग्रामीण रुग्णालयातही उपचारास विलंब २३ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सर्व महिलांना बेशुद्धावस्थेत बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथे प्रमुख डॉक्टर उपस्थित नव्हते. अन्य डॉक्टरांनीही परिस्थितीचे गांभीर्य न ओळखल्याने महिलांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. त्यावेळी उपस्थित नातेवाईक डॉक्टरांवर संतापल्याने त्यांनी सर्व रुग्णांना घाटीत घेऊन जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी सुमारे एक ते दीड तास उपचाराविना तेथे ठेवून घेतल्याने रुग्णांची प्रकृती अधिक ढासळली. चालतीबोलती महिला काही वेळातच बेशुद्ध झाली. -सतीश राठोड (नातेवाईक) शासनाने नुकसानभरपाई द्यावी विषबाधेच्या घटनेत मरण पावलेल्या सर्व महिला कष्टकरी आहेत. त्यांच्या मजुरीवरच त्यांचे घर चालत होते. त्यामुळे या घटनेतील मृतांच्या कुटुंबांचा आधार गेला आहे. त्यांच्या उपचारासाठी झालेला खर्चही मोठा आहे, याचा विचार करून या कुटुंबियांना शासनाने तातडीने आर्थिक मदत दिली पाहिजे. -संजय टेलर, (सामाजिक कार्यकर्ते) ‘त्या’ शेतकर्यास शिक्षा झाली पाहिजे शेतकरी भालेकर याने बळजबरीने आमच्या आईला कामावर नेले. आईने कामावर जाण्यास नकार दिला होता. मात्र, तो आग्रह करून आईसह अन्य महिलांना शेतात घेऊन गेला. पिकावर औषध फवारणी करताना वापरण्यात आलेला माठ नष्ट केला नाही. एवढेच नव्हे तर त्याचा वापर पाणी पिण्यासाठी मजूर महिला करीत असल्याचे दिसूनही शेतमालकाने त्यांना मज्जाव केला नाही. परिणामी, एवढी भीषण घटना घडली. त्यामुळे या घटनेला जबाबदार असलेल्या शेतमालकास कठोर शिक्षा झाली पाहिजे. -दिनेश राठोड अॅम्ब्युलन्सची भीती गावात आठ दिवसांत तीन महिलांना प्राणास मुकावे लागले. त्यांचे मृतदेह अॅम्ब्युलन्समधूनच गावात आणण्यात आले. त्यामुळे आता अॅम्ब्युलन्सचीच भीती वाटते. गावाच्या दिशेने कोणतीही अॅम्ब्युलन्स येत असल्याचे दिसताच छातीत धडकी भरते. - मांगीलाल रूपा राठोड