मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा
By Admin | Updated: February 19, 2015 00:45 IST2015-02-19T00:42:32+5:302015-02-19T00:45:06+5:30
लातूर : मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे़ सद्यस्थितीत मांजरा प्रकल्पात १३़४०८ दलघमी पाणीसाठा असून, या साठ्यावर चालू उन्हाळ्यात तहान भागवावी लागणार आहे़

मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा
लातूर : मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे़ सद्यस्थितीत मांजरा प्रकल्पात १३़४०८ दलघमी पाणीसाठा असून, या साठ्यावर चालू उन्हाळ्यात तहान भागवावी लागणार आहे़ लातूर शहराला दररोज ३५ एमएलडी पाणी लागते़ या प्रमाणात प्रकल्पातून पाणी घेतले तर उन्हाळा तीव्र जाणार आहे़ त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दहा दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे़ सध्या आठ दिवसाआड पाणी सोडले जाते़ मे अखेरपर्यंत पाणी पुरविण्यासाठी एप्रिल पासून दहा दिवसाला पाणी सोडले जाणार आहे़ दरम्यान, जिल्ह्यातील विहिरींची पाणीपातळी अडीच मिटरने घटल्याने तीव्र पाणीटंचाईचे सावट आहे़
लातूर शहराला मांजरा प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य ठिकाणचे पाणी देण्याची सोय अद्याप झाली नाही़ त्यामुळे आहे ते पाणी काटकसरीने वापर करुन उन्हाळा घालविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आहे़ सध्या मांजरा प्रकल्पात १३़४०८ दलघमी पाणी आहे़ हे पाणी झपाट्याने कमी होत आहे़ लातूर शहराबरोबर अंबाजोगाई, केज, धारुर, कळंब आदी शहरांनाही याच प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. प्रकल्पातील ८० टक्के पाण्याचा वापर लातूर शहरासाठी तर उर्वरित २० टक्क्यामध्ये अंबाजोगाई, केज, धारुर व कळंब या शहराला दिले जाते़ त्यामुळे सध्यातरी काटकसर हाच पर्याय आहे़ लातूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाण्याने तळ गाढला आहे़ तावरजा, व्हटी व मसलगा प्रकल्पातील पाणी जोत्याखाली आहे़ रेणा, तिरु, देवर्जन, साकोळ व घरणी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा आहे़ मात्र हे पाणी लातूरला आणणे अशक्य आहे़ त्या-त्या भागातील गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे मांजरा प्रकल्पावरच शहराची तहान आहे़ सध्या तावरजा मध्यम प्रकल्पात ०़३३२, व्हटी ०़२१५, रेणापूर १़४७३, तिरु ६़५१०, देवर्जन २़४७२, साकोळ ०़५८८, घरणी ५़४३२ दलघमी पाणी आहे़ शिवाय, विहिरींचीही पाणीपातळी खालावली आहे़ त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे़ पाणी काटकसरीने न वापरल्यास टंचाईचा सामना करावा लागेल़ (प्रतिनिधी)
यंदाचा उन्हाळा तीव्र पाणीटंचाईचा असून, गेल्या पाच वर्षांत जानेवारी महिन्यात सरासरी जिल्ह्याची पाणीपातळी ५.६३ मीटर होती. यंदा ८.१८ मीटरवर गेली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २.५५ मीटरने पाणीपातळी घटली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १०.२१ मीटरने औसा तालुक्याची पाणीपातळी असून, जळकोट तालुक्यात सर्वाधिक ४.२८ मीटरची घट आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्ह्यातील १०९ विहिरींचे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निरीक्षण केले असून, या निरीक्षणात ८.१८ मीटरवर पाणीपातळी असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील पाच वर्षांत याच विहिरींची पाणीपातळी ५.६३ मीटर होती. गतवर्षीच्या तुलनेत ५.५५ मीटर्सची घट निरीक्षणाअंती समोर आली आहे. अहमदपूर तालुक्यात १५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, या विहिरीतील पाणीपातळी मागील पाच वर्षांत ५.४७ होती. आता ७.७४ वर गेली आहे. २.२७ मीटरची घट आहे. तर औसा तालुक्यातही १५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत या विहिरींची पाणीपातळी ७.२३ होती. आता १०.२१ असून, २.९८ ची घट आहे. चाकूर तालुक्यात ७ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.१० मीटर पाणीपातळी होती. आता ७.३३ वर आहे. २.२३ मीटरची घट असल्याचे निदर्शनास आले आहे. लातूर तालुक्यात १८ विंधन विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.३६ मीटर पाणीपातळी होती. आता ७.६२ असून, २.२६ ची घट आहे. निलंगा तालुक्यात १७ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ६.८२ मीटर पाणीपातळी होती. आता ९.३३ वर आहे. २.५१ मीटरची घट आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात ५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ६.२८ मीटर पाणीपातळी होती. आता ९.२० मीटर असून, २.९२ मीटरची घट आहे. रेणापूर तालुक्यात ११ विंधन विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. मागील पाच वर्षांत या विहिरींची पाणीपातळी ५.१८ मीटर होती. आता ४.४८ मीटर असून, २.३० ची घट आहे.
लातूर शहरासह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ सध्या जिल्ह्यात २६ टँकरने ४४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ शहरातील विंधनविहिरीची पाणीपातळीही खोल गेली आहे़ शिवाय, मांजरा प्रकल्पातील पाणी कमी होत असल्याने, शहरातही टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे़ शहरालगत असलेल्या वस्त्यांत तीव्र पाणीटंचाई आहे़ या वस्त्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, असे प्रस्ताव येत आहेत.