आयसीयूत व्हेंटिलेटर, ऑक्सिजनवरील रुग्णांना लहान मुलांप्रमाणे भरवतो घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:02 IST2021-04-30T04:02:12+5:302021-04-30T04:02:12+5:30

संतोष हिरेमठ औरंगाबाद : आयसीयूत म्हटले की व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि गंभीर रुग्ण हे दृश्य नजरेसमोर येते. औषधोपचाराबरोबर आजारातून लवकर ...

The ventilator in the ICU fills the patients on oxygen like a small child | आयसीयूत व्हेंटिलेटर, ऑक्सिजनवरील रुग्णांना लहान मुलांप्रमाणे भरवतो घास

आयसीयूत व्हेंटिलेटर, ऑक्सिजनवरील रुग्णांना लहान मुलांप्रमाणे भरवतो घास

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : आयसीयूत म्हटले की व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि गंभीर रुग्ण हे दृश्य नजरेसमोर येते. औषधोपचाराबरोबर आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी आहारही महत्त्वाचा ठरतो. ‘आयसीयू’तील रुग्णांना ऑक्सिजन मास्क लावलेला असतो. त्यामुळे ते अगदी लहान मुलांसारखे असतात. स्वत:च्या हाताने जेऊही शकत नाही अन् पाणीही पिऊ शकत नाही. पण आम्ही त्यांना घास भरवतो. त्यांच्या औषधोपचाराबरोबर आहाराचीही काळजी घेतो, अशा भावना घाटीतील परिचारिकांनी व्यक्त केल्या.

आयसीयूत रुग्ण म्हटला की गंभीर प्रकृती म्हटले जाते. कोणाला एनआयव्ही असतो, कोणी व्हेंटिलेटरवर असतो. औषधोपचाराबरोबर रुग्णांना आहारही गजरेचा असतो. रुग्णांच्या प्रकृतीनुसार हाय प्रोटीन डायट, फूल डायट की डायबिटीज डायट द्यायचा हे डाॅक्टर सांगतात. त्यानुसार हा डायट म्हणजे आहार देण्याचे काम परिचारिका, ब्रदर करतात. जनरल वॉर्डातील रुग्ण हे स्वत:च्या हाताने जेवण करू शकतात. परंतु आयसीयूतील अनेक रुग्ण स्वत:च्या हाताने पाणीही पिऊ शकत नाही. ज्याप्रकारे लहान बाळाला आई घास भरवते, तशाच प्रकारे घाटीतील आयसीयूत परिचारिका, ब्रदर कोरोना रुग्णांना स्वत:च्या हाताने घास भरवतात. आजारापणामुळे रुग्णांच्या तोंडाची चव गेलेली असते. अशावेळी काही रुग्ण जेवण न करण्याचा हट्टही करतात. परंतु त्यांची समजूत काढून जेवण दिले जाते. नातेवाइकांनी दिलेले जेवणही त्यांना भरवले जाते. गंभीर रुग्णांना नळीद्वारे (राइस ट्यूब) दूध दिले जाते. या स्थितीने मन हळहळते. आयसीयूतील रुग्ण घरी जाणे हा सर्वांत आनंददायी क्षण असतो, असे परिचारिका म्हणाल्या.

अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर , सुपर स्पेशालिटी ब्लाॅक विशेष कार्य अधिकारी डाॅ. सुधीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसेविका किरण डोंगरदिवे, आम्रपाली शिंदे, उमा गिरी, ब्रदर स्नेहल बनसोडे यांच्यासह घाटीतील परिचारिका, ब्रदर रुग्णांसाठी परिश्रम घेत आहेत.

--

सर्वप्रकारची काळजी घेतो

आयसीयूतील रुग्णांना ऑक्सिजन मास्क लावलेला असतो. त्यामुळे त्यांना जेवण, पाणी देताना मास्क काढावा लागतो. एक घास भरविल्यानंतर लगेच मास्क लावावा लागतो. अन्यथा ऑक्सिजन पातळी कमी होते. जे रुग्ण जेऊ शकत नाही, त्यांना नळीद्वारे (राइस ट्यूब) दूध दिले जाते. अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांची आम्ही काळजी घेतो.

-आम्रपाली शिंदे, इन्चार्ज सिस्टर, ३३ आयसीयू, एसएसबी

-------

आहारही महत्त्वाचा

उपचाराबरोबर आहारही महत्त्वाचा आहे. जे रुग्ण जेऊ शकत नाही, त्यांना लिक्विड डायट दिले जाते. जे रुग्ण लिक्विड डायटही घेत नाही, काही रुग्णांना औषधीही बारीक करून देतो. त्यांना सलाईन लावली जाते.

-उमा गिरी, अधिपरिचारिका

-----

फोटो ओळ...

१)कोरोना रुग्णांना अशाप्रकारे आहार दिला जातो.

२) घाटीतील परिचारिका.

३)आम्रपाली शिंदे, इन्चार्ज सिस्टर, ३३ आयसीयू, एसएसबी

४)-उमा गिरी, अधिपरिचारिका

Web Title: The ventilator in the ICU fills the patients on oxygen like a small child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.