औरंगाबाद जिल्ह्यात वाहन विक्रीत पडला ‘रिव्हर्स गीअर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 20:28 IST2019-04-05T20:13:47+5:302019-04-05T20:28:16+5:30
तब्बल २५ कोटींनी महसूल घटला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात वाहन विक्रीत पडला ‘रिव्हर्स गीअर’
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही कालावधीत प्रत्येक वर्षी वाहनांची संख्या वाढत होती. यंदा मात्र गतवर्षीपेक्षा ११ हजारांनी वाहन संख्या घटल्याचे समोर आले. त्यासाठी जीएसटी, महागाई आणि दुष्काळाचे कारण पुढे केले जात आहे. या सगळ्यामुळे आरटीओ कार्यालयाला २०१८-१९ या आर्थिक वर्षात दिलेले उद्दिष्टही पूर्ण करता आले नाही. तब्बल २५ कोटींनी महसूल घटला आहे.
औरंगाबाद आरटीओ कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड, अशी तीन जिल्हे आहेत. २०१६-१७ या आर्थिक वर्षात या तीन जिल्ह्यांत ९० हजार ८८७ नव्या वाहनांची नोंद झाली होती. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ३ हजार ६६९ वाहनांची नोंद झाली होती. या आर्थिक वर्षात १८९ कोटी रुपयांच्या महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट होते. उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल गोळा झाला.
तब्बल २३३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तुलनेत २०१८-१९ या आर्थिक वर्षात औरंगाबाद जिल्ह्यात ९१ हजार ८४७ वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंद झाली. गतवर्षीपेक्षा तब्बल ११ हजार ८२२ वाहनांची घट झाल्याचे समोर आले आहे. वाहनांची संख्या घटल्यामुळे आरटीओ कार्यालयास देण्यात आलेल्या २५६ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी के वळ २२९ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला. वाहन संख्या कमी होण्यासाठी जीएसटी, महागाई आणि दुष्काळ ही कारणे असल्याचे बोलले जात आहे.
उद्दिष्टासाठी प्रयत्न
आरटीओ कार्यालयास दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जातो; परंतु ११ हजारांनी वाहनांची संख्या कमी झाली. त्याचा परिणाम महसुलावर झाला. तरीही जुन्या वाहनांकडून त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात आला. -सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी
अनेक कारणे
गेल्या चार महिन्यांपासून वाहनांची विक्री मंदावली आहे. त्यासाठी अनेक कारणे आहेत. दुष्काळाचा १० ते १५ टक्के परिणाम आहे; परंतु जीएसटीचा परिणाम म्हणता येणार नाही. जीएसटीमुळे वाहन स्वस्त झाले आहे.
-राहुल पगारिया, वाहन वितरक