‘त्या’ वस्तीशाळा शिक्षकांनाही नियुक्त्या
By Admin | Updated: May 30, 2014 00:23 IST2014-05-29T23:20:09+5:302014-05-30T00:23:03+5:30
बीड:वस्तीशळेवरील निमशिक्षकांना नियुक्त्या देताना काही शिक्षकांना डावलण्यात आले होते;

‘त्या’ वस्तीशाळा शिक्षकांनाही नियुक्त्या
बीड:वस्तीशळेवरील निमशिक्षकांना नियुक्त्या देताना काही शिक्षकांना डावलण्यात आले होते; मात्र त्यांना देखील आचारसंहितेनंतर टप्प्याटप्प्याने नियुक्त्या दिल्या जाणार असल्याचे सीईओ राजीव जवळेकर यांनी स्पष्ट केले आहे़ त्यामुळे उर्वरित ४१२ निमशिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे़ जिल्ह्यात ६५० वस्तीशाळा शिक्षक आहेत़ शासनआदेशानुसार ज्या निमशिक्षकांनी डीएड पूर्ण केले आहे, त्यांची सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षक म्हणून नियुक्ती करायची होती़ मात्र, हे करताना दर्जावाढ, बदल्या, समायोजन करावे असा शासनादेश होता़ जिल्हा परिषदेने दर्जावाढ करण्याची प्रक्रियाही सुरु केली होती; परंतु पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ती ठप्प करावी लागली़ दरम्यान, जिल्हा परिषदेने १७ मे रोजी ६५० पैकी २३८ निमशिक्षकांना शिक्षक म्हणून तर बंद वस्तीशाळेतील १४७ पैकी केवळ १०९ जणांना निमशिक्षक म्हणून आदेश दिले आहेत़ त्यामुळे उर्वरित ४१२ निमशिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती़ नियुक्त्यांसाठी या निमशिक्षकांनी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे धाव घेतली होती़ टप्प्याटप्प्याने नियुक्त्या सीईओ राजीव जवळेकर म्हणाले, ३५२ प्राथमिक तर २२३ उच्च प्राथमिक शाळांना मंजुरी मिळाली आहे़ या शाळांमध्ये प्रत्येकी दोन शिक्षक नियुक्त करायचे आहेत़ त्यात एक नियमित शिक्षक व एक निमशिक्षक नेमायचा आहे़ वस्तीशाळांमधील २३८ जणांना शिक्षक म्हणून आदेश दिले आहेत़ उर्वरित ४१२ जणांना टप्प्याटप्प्याने शिक्षक म्हणून नियुक्त्या देण्यात येतील़ त्यांना वार्यावर सोडणार नाही, असेही जवळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले़ शिक्षण सचिव चोकलिंगम यांनीही जसजशा जागा रिक्त होतील तसतशा नियुक्त्या देण्याच्या सूचना दिल्या आहेत़ त्याप्रमाणे नियुक्त्या दिल्या जाणार आहेत, असे जवळेकर म्हणाले़ त्यामुळे ४१२ निमशिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ टप्प्याटप्प्याने नियक्त्या जिल्ह्यात मुख्याध्यापकांची ४६९ पदे मंजूर आहेत़ १४७७ प्राथमिक पदवीधर तर ६९८८ सहशिक्षकांची पदे देखील मंजूर आहेत़ प्रत्यक्षात मात्र, ४१० मुख्याध्यापक, ४९९ प्राथमिक पदवीधर, ७३९७ सहशिक्षक कार्यरत आहेत़ पदोन्नत्यांमुळेही जागा रिक्त होतील़ बिंदूनामावली, समायोजन या प्रक्रिया देखील आचारसंहितेनंतर पूर्ण करण्यात येणार असल्याचे सीईओ राजीव जवळेकर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)