वाशीत सेना तर परंड्यात राष्ट्रवादीने दाखविली ताकद

By Admin | Updated: October 23, 2014 00:15 IST2014-10-23T00:06:39+5:302014-10-23T00:15:23+5:30

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद परंडा विधानसभा मतदार संघामध्ये खऱ्याअर्थाने तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. राहुल मोटे यांनी शिवसेना

Vashish army and NCP have power shown in Parandas | वाशीत सेना तर परंड्यात राष्ट्रवादीने दाखविली ताकद

वाशीत सेना तर परंड्यात राष्ट्रवादीने दाखविली ताकद


बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद
परंडा विधानसभा मतदार संघामध्ये खऱ्याअर्थाने तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. राहुल मोटे यांनी शिवसेना उमेदवार ज्ञानेश्वर पाटील, रासप उमेदवार बाळासाहेब हाडोंग्रीकर यांच्यावर मोठ्या फरकाने मात करीत हॅट्ट्रीक साधली. मात्र, यावेळी एका पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या गडाला सुरूंग लावल्याचे प्रकर्षाने जानवते. काँग्रेसचा गड म्हणून ओळख असलेल्या वाशी शहरातून शिवसेनेला तर राष्ट्रवादीची हुकुमत असलेल्या भूम शहरामध्ये रासपला मताधिक्य मिळाले. असे असतानाच शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या परंडा शहरामध्येही राष्ट्रवादीने ताकद दाखवून दिल्याचे दिसते.
परंडा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीसोबतच शिवसेना, रासप आणि काँग्रेस पक्षानेही आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. भूम, वाशी आणि परंडा या शहरामध्ये असलेल्या मतदानाची संख्या लक्षात घेता या प्रमुख पक्षांनी ग्रामीण भागासोबतच शहरांवरही लक्ष केंद्रित केले होते. आपापले गड राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. भूम शहराला राष्ट्रवादीचा गड समजले जाते. कारण नगर परिषद आणि पंचायत समिती ही दोन्ही सत्ताकेंद्र राष्ट्रवादीकडे आहेत. ग्रामीण भागासोबतच शहरातूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांना मोठे मताधिक्य मिळेल, असे कार्यकर्ते सांगत होते. परंतु, कार्यकर्त्यांचे हे गणित रासपने काहीअंशी का होईन बिघडविल्याचे घेतलेल्या मतदानावरून दिसून येते. बाळासाहेब हाडोंग्रीकर यांना शहरातील तेरा बुथवर मिळून ४ हजार ७६ मते मिळाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. मोटे यांना ३००३ मिते मिळाली. येथून सेनेलाही मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या. परंतु, रासपमुळे सेनेचा अपेक्षाभंग झाला. सेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांना अवघ्या १ हजार ३२५ मतांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेस पक्षाचे नुरोद्दीन चौधरी यांना अवघी १ हजार २१ मते मिळाली.
वाशी हे शहर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. वाशी ग्रामपंचायत काँग्रेसच्या चेडे गटाकडे आहे. प्रशांत चेडे हे स्वत: जिल्हा परिषद सदस्य आहेत. मात्र याच बालेकिल्यात काँग्रेस पक्षाच्याच उमेदवाराला मोठा फटका सहन करावा लागला आहे. नुरोद्दीन चौधरी यांना १ हजार मतेही मिळू शकली नाहीत. अवघ्या ५२७ मतांवर त्यांना समाधान मानावे लागले. याच्या उलट शिवसेना उमेदवार पाटील यांच्या पारड्यात मात्र घसघसीत मते पडली. २ हजार ६२० मते घेवून त्यांनी राष्ट्रवादीसोबतच रासपच्या उमेदवारालाही ओव्हरटेक केले. दुसरीकडे राष्ट्रवादीला १ हजार ७८१ तर रासपला १ हजार ६६४ मते पडली. एकूणच काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेने बाजी मारली आहे.
दरम्यान, परंडा हा पूर्वीपासून शिवसेनेचाच बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथील पंचायत समिती आणि नगर परिषद दोन्ही सत्ता केंद्र सेनेच्या हातात आहेत. त्यामुळे येथून शिवसेना उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांना मोठे मताधिक्य मिळेल असा पदाधिकाऱ्यांसोबतच कार्यकर्त्यांनाही ठाम विश्वास होता. तर काँग्रेसचे उमेदवार नुरोद्दीन चौधरी यांच्यामुळेही राष्ट्रवादीच्या मतात फुट पडेल असे बोलले जात होते. त्याअनुषंगाने कार्यकर्त्यांतून आकडेमोड केली जात होती. मात्र मतदारांनी काही प्रमाणात सेनेला झुकते माप दिले असले तरी हा फरक फारसा नाही. शिवसेनेला १४ बुथवर ३ हजार ७६० इतकी मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३ हजार ५१९ मते पडली. रासपचे उमेदवार हाडोंग्रीकर यांना हजारीही गाठता आली नाही. ९६० मतांवर त्यांना समाधान मानावे लागले. हीच परिस्थिती काँग्रेस उमेदवार चौधरी यांची झाली. होमपिचवर त्यांना अवघी ८३२ मते पडली. त्यामुळे कार्यकर्त्यांतून करण्यात आलेली आकडेमोड साफ फोल ठरली. एकूणच या तीनही शहरांमध्ये एका पक्षाने दुसऱ्याच्या बालेकिल्याला सुरुंग लावण्याचे काम केले आहे.

Web Title: Vashish army and NCP have power shown in Parandas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.