वाशी, तुळजापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस
By Admin | Updated: August 5, 2016 00:11 IST2016-08-05T00:04:30+5:302016-08-05T00:11:07+5:30
उस्मानाबाद : जिल्हाभरातील सुमारे चाळीसवर समित्यांनी पाणीपुरवठा योजनांची कृती आराखड्यानुसार कामे न करता रक्कम हडपल्याचे समोर आले होते.

वाशी, तुळजापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस
उस्मानाबाद : जिल्हाभरातील सुमारे चाळीसवर समित्यांनी पाणीपुरवठा योजनांची कृती आराखड्यानुसार कामे न करता रक्कम हडपल्याचे समोर आले होते. सदरील वसूलपात्र रक्कम तातडीने वसूल करा, अन्यथा संबंधित समिती पदाधिकाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाई करा, असे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून कारवाईच्या अनुषंगाने नोटिसा बजाविल्या असता, २२ ते २३ समित्यांनी तब्बल चाळीस लाखांचा भरणा केला आहे. ज्या समित्यांनी हडपलेली रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली, अशा समित्यांविरूद्ध फौजदारी कारवाई प्रस्तावित केली होती. परंतु, वाशी आणि तुळजापूरच्या ‘बीडीओं’नी गुन्हे नोंदविण्यास चालढकल केली. त्यामुळे उपरोक्त दोन्ही ‘बीडीओं’ना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून सन २००६ पर्यंत तब्बल ११९ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या होत्या. यातील जवळपास सर्वच योजना त्या-त्या गावातील पाणीपुरवठा समित्यांच्या माध्यमातून राबविण्यात आल्या होत्या. काही समित्यांकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने योजना राबवून पाणीपुरवठाही सुरू करण्यात आल्या. परंतु, काही पाणी योजनांना समिती पदाधिकाऱ्यांच्या खाबुगिरीचे ग्रहण लागले. अशा समित्यांची संख्या तब्बल ४० एवढी होती. सदरील योजनांची चौकशी केली असता, समिती पदाधिकाऱ्यांनी अंदाजपत्रकानुसार कामे न करताच पैैसे लाटल्याचे समोर आले होते. सदरील रक्कम वसूल करण्याचे आदेश शासनाकडून वेळोवेळी देण्यात आले. परंतु, समिती पदाधिकाऱ्यांनी ‘आपले कोण काय करणार?’ या अविर्भावात वावरून वसूलपात्र रक्कम शासनखाती जमा केली नाही. दरम्यान, समित्यांच्या अशा प्रकारच्या खाबुगिरीमुळे कोट्यवधी रूपये खर्च होवूनही टाकीमध्ये पाणी पडू शकले नाही. सदरील प्रकार उजेडात आल्यानंतर शासनाने संबंधित पाणीपुरवठा समित्यांकडून अपहारित रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने तत्कालीन चाळीस पाणीपुरवठा समित्यांना नोटीस बजावून वसूलपात्र रक्कम शासनखाती जमा करण्याबाबत आदेशित केले होते.
दरम्यान, सुरूवातीला चाळीस पैैकी चार-पाच समित्यांनीच रक्कम जमा केली. परंतु, उर्वरित समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नोटिसा बेदखल केल्या. त्यामुळे संबंधित समित्यांना थेट फौजदारी कारवाई करण्याच्या अनुषंगाने नोटीस देण्यात आली. गुन्हे दाखल होण्याच्या भितीने २० ते २५ समित्यांकडून अपहारित रक्कम शासनखाती जमा करण्यात आली. आणखी दहा ते पंधरा समित्यांकडून रक्कम जमा होणे बाकी आहे. यातील काही समित्यांनी रक्कम भरण्यासाठी कालावधी वाढवून मागितला आहे. तर चार ते पाच समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे सदरील समिती पदाधिकाऱ्यांविरूद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी, निलेगाव आणि आरळी बुदु्रक. कळंब तालुक्यातील शिराढोणवाडी तर वाशी तालुक्यातील घोडकेवाडी या गावांचा समावेश आहे. दरम्यान, फौजदारी कारवाईचा प्रस्ताव संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला.
परंतु, तुळजापूरचे बीडीओ आर. जी. शिनगारे व वाशीच्या बीडीओ सुप्रिया चव्हाण यांनी ‘हे काम आमचे नाही’, असे पत्राद्वारे कार्यकारी अभियंत्यांना कळविले असता सीईओंच्या आदेशानुसार संबंधित बिडीओंना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. कारवाईचे काम आपलेच असल्याचे सांगत ‘गुन्हे दाखल करा, अन्यथ कारवाईला सामोरे जा’, असा इशाराही नोटिसेद्वारे देण्यात आला आहे. असे असतानाही अद्याप कारवाई झालेली नाही, हे विशेष. (प्रतिनिधी)