घाटीतील सेवा ‘भगवान भरोसे’
By Admin | Updated: July 27, 2014 01:18 IST2014-07-27T01:05:09+5:302014-07-27T01:18:20+5:30
मुजीब देवणीकर, औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्त्वपूर्ण केंद्र, अत्यावश्यक आरोग्य सेवेचा कणा, अशी विविध बिरुदे लावलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

घाटीतील सेवा ‘भगवान भरोसे’
मुजीब देवणीकर, औरंगाबाद
मराठवाड्याची राजधानी, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्त्वपूर्ण केंद्र, अत्यावश्यक आरोग्य सेवेचा कणा, अशी विविध बिरुदे लावलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रुग्ण ‘भगवान भरोसे’ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णांचे काहीही झाले तरी चालेल; पण आमची झोप झाली पाहिजे, असा काहींसा पवित्रा येथील कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे दिसते.
घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि अहमदनगर, जळगाव, धुळे, मालेगाव येथूनही रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. रुग्णालयात चांगली दर्जेदार आणि ‘प्रामाणिक’ सेवा येथे मिळते, असा रुग्णांचा दृढ विश्वास आहे.
या विश्वासाला छेद देण्याचे काम कर्मचारी करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. रुग्णालयात १०५३ हून अधिक रुग्ण वेगवेगळ्या वॉर्डांत उपचार घेत होते. प्रतिनिधीने रात्री २ वाजता घाटीच्या पीबीएक्सवर फोन लावला असता संबंधित कर्मचाऱ्याने उचलला; पण संभाषण टाळून रिसिव्हर तसाच बाजूला ठेवून दिला. पीबीएक्सवरील सर्व दूरध्वनी बंद होते. काही क्रमांकावर बेल वाजत होती; पण कोणी प्रतिसाद देत नव्हता. शेवटी पहाटे चार वाजता घाटी रुग्णालय गाठून पाहणी केली असता ठिकाणी घाटीची दूरध्वनी सेवाकक्ष आहे तेथे संबंधित कर्मचारी ब्लॅकेट पांघरूण खुशाल झोपले होते. झोपेत अडथळा नको म्हणून त्यांनी पीबीएक्सचा मुख्य रिसिव्हर बाजूला ठेवून दिला होता. आसपास चौकशी केली असता कर्मचाऱ्याचे नाव ‘भगवान’ दारवंटे असल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराबाबत अपघात विभागात उपस्थित असलेल्या सीएमओ यांना सांगितले असता त्यांनी झोपलेल्या कर्मचाऱ्याची बाजू घेत ‘मी दोन ते तीन वेळेस बोलले, फोन चालू आहेत, असे सांगितले. ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांना फोन लावून पाहण्यास सांगितल्यावर एगेंज टोन येत होता. स्मितहास्य करीत त्यांनी ‘हो...बाजूला ठेवलाय, मी त्यांना सांगते’ म्हणून विषयाला पूर्णविराम दिला.
अत्यावश्यक सेवा काय कामाची?
मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून घाटीला रात्री दूरध्वनी येत असतात.
अनेक खाजगी डॉक्टर गंभीर रुग्णाला पाठविण्यापूर्वी घाटीत व्यवस्था होईल का चौकशी करतात. घाटीतील ब्लड बँकेत अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे रात्री काम पडते.
घाटीच्या पीबीएक्सवर तब्बल २५० हून अधिक एक्सटेंशन आहेत.
रुग्ण गंभीर झाल्यास संबंधित निवासी डॉक्टर, परिचारिका वरिष्ठांना संपर्क साधतात.
सखोल चौकशी करणार
घाटीचे पीबीएक्स दररोज रात्री बंद ठेवण्यात येतात का? या प्रश्नावर वैद्यकीय अधीक्षक पी. एल. गट्टाणी यांनी सांगितले की, नाही. २४ तास पीबीएक्स सुरू असते. मध्यरात्री कर्मचारी बंद करून झोपत असतील तर याची सखोल चौकशी करण्यात येईल.
रात्री एकही कर्मचारी मदत करीत नाही
1पहाटे तीन वाजता सादातनगर, रेल्वेस्टेशन येथील एक तरुण रिक्षात बसून घाटीच्या प्रवेशद्वारावर नातेवाईकांसह आला. त्याला उलटी झाली होती आणि पाठीत दुखत होते. रुग्णालयात नेण्यासाठी कोणतेही स्ट्रेचर, खुर्ची उपलब्ध नसल्याने तो चालत सीएमओंच्या समोरील कक्षात गेला. सीएमओ खुर्चीवरून उठून त्याला तपासतात आणि हा तर मरण पावला आहे, असे सांगून मोकळे होतात. दोन मिनिटांपूर्वी पायी आलेला माणूस कसा मरण पावू शकतो, यावर नातेवाईकांचा विश्वासच बसायला तयार नव्हता. या रुग्णाची कोणतीही नोंद घाटीच्या रजिस्टरमध्ये करण्यात आली नाही. रूग्णाला प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहिले असताना पहाटे ३ वाजता एकही रुग्ण आला नसल्याचे सीएमओंनी ‘लोकमत’ला सांगितले.
2घाटीच्या अपघात विभागात मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत वेगवेगळ्या आजारांचे, अपघातग्रस्त रुग्ण सतत येत असतात. ज्या रुग्णांना दाखल करून घ्यायचे असते त्याची कागदपत्रे तयार करून वॉर्डात पाठविण्यात येतात. अपघात विभागातून वॉर्डात रुग्णाने पायी जावे किंवा स्ट्रेचर स्वत: नातेवाईकांनी ओढावी हा नियम आहे. रात्री एकही कर्मचारी रुग्णांना मदत करीत नाही. स्ट्रेचर ओढणे प्रत्येकाला जमत नाही, ती कला कर्मचाऱ्यांनाच अवगत असते. अशावेळी काय करायचे?