घाटीतील वैद्यकीय सेवा नव्या वर्षामध्ये महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:28 IST2017-12-23T00:28:07+5:302017-12-23T00:28:10+5:30
घाटी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा नव्या वर्षापासून वाढणार आहे. यामध्ये बाह्यरुग्ण विभागाचे शुल्क २० रुपये होणार असून, अन्य सेवांचे शुल्क निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाढीव शुल्कांमुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक झळ बसणार असल्याचे दिसते.

घाटीतील वैद्यकीय सेवा नव्या वर्षामध्ये महागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा नव्या वर्षापासून वाढणार आहे. यामध्ये बाह्यरुग्ण विभागाचे शुल्क २० रुपये होणार असून, अन्य सेवांचे शुल्क निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाढीव शुल्कांमुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक झळ बसणार असल्याचे दिसते.
मराठवाड्यासह लगतच्या भागातून दररोज हजारो गोरगरीब रुग्ण उपचारासाठी घाटीत दाखल होतात. याठिकाणी रुग्णांना दर्जेदार, अद्ययावत सेवा देण्यासाठी अनेक आधुनिक यंत्रसामुग्री दाखल झाली आहे. गोरगरीब आणि गरजू रुग्णांना खाजगी रुग्णालयांत मिळणाºया सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत वाढलेली महागाई आणि अन्य गोष्टींचा विचार करून आता देण्यात येणाºया सेवांच्या शुल्कांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाटी रुग्णालयात नवे शुल्क निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची गुरुवारी बैठक पार पडली. शुल्कवाढीसंदर्भात प्रत्येक विभागाला माहिती देऊन दर निश्चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. ‘ओपीडी’ शुल्क सध्या १० रुपये असून, ते आता २० रुपये होईल. आंतररुग्ण शुल्क ३० रुपये आकारण्यात येणार असल्याचे समजते.
शुल्कवाढीसंदर्भात ‘जीआर’ आलेला आहे. ३० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. यामध्ये बाह्यरुग्ण विभागाचे शुल्क २० रुपये केले जाणार आहे. १ जानेवारीपासून या वाढीव शुल्काची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.भारत सोनवणे यांनी दिली.